CM Uddhav Thackeray-Sanjay Raut | Photo Credits: Twitter

महाराष्ट्रामध्ये यंदा 28 नोव्हेंबर दिवशी राज्यातील महाविकास आघाडी म्हणजेच 'शिवसेना-एनसीपी- कॉंग्रेस' या तीन पक्षांच्या सरकारची वर्षपूर्ती होत आहे. याच पार्श्वभूमीवर सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या 'अभिनंदन मुलाखत' (Abhinandan Mulakhat) मध्ये संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना कोरोना संकट, वर्षपूर्तीचा अनुभव, विरोधकांचे हल्ले-प्रतिहल्ले ते ठाकरे कुटूंबांवरील आरोप अशा विविध गोष्टींवर बोलतं करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये विरोधकांचा समाचार घेतला आहे. दरम्यान सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यू वर विरोधकांनी मढाच्या टाळू वरील लोणी खाण्याचा प्रयत्न झाला असं म्हणत विरोधकांचा समाचार घेतला आहे.

दरम्यान ठाकरे कुटुंबावर आरोप झाले. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, मुलाबाळांवरून, कुटूंबावर वैयक्तिक हल्ले करण्याची महाराष्ट्रात संस्कृती नाही. जर असा प्रकार होणार असेल तर विरोध करणार्‍यांनी देखील त्यांच्या कुटुंब, मुलंबाळांचा विचार करावा. तुम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत आम्हांला तुमची खिचडी कशी शिजवायची हे ठाऊक आहे. असे सांगताना विरोधकांना उद्धव ठाकरेंनी सूचक इशारा दिला आहे. संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे चंगू मंगूच्या फालतू गप्पा; निलेश राणे यांचा शिवसेनेवर निशाणा.

सोबतच ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैर वापर केला जात आहे असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सूडबुद्धीने राजकारण करायचं असेल तर आम्ही देखील तयार आहोत. अमच्याकडेही नावं आहेत. विरोधकांनी 1 नाव काढलं तर आम्ही 10 काढू शकतो. यासोबतच हिंदुत्त्वावरून टीका करणार्‍यांवर त्यांनी पुन्हा प्रतिहल्ला करताना लव्ह जिहाद, गोवंश हत्या बंदी यांवरही बोलले. भाजपाची सत्ता गोव्यात असूनही तेथे बीफ बॅन का नाही? असा सवाल विचारला आहे.

कोरोनाच्या दृष्टीने अजून थोडा काळ कठीण आहे असे सांगत त्यांनी नागरिकांना खबरदारी बाळगण्याची, सुरक्षेची त्रिसुत्री सांभाळण्याचं आवाहन केले आहे.