Maratha Reservation Protest: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आज (27 फेब्रुवारी) वादळी चर्चेचा विषय ठरले. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका करताना वापरलेल्या शब्दांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधक यांनी चर्चेदरम्यान मांडलेल्या मुद्द्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उत्तर दिले. या वेळी जारंगे पाटील यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी थेट शब्दात सुनावले. जरांगे पाटील यांची पार्श्वभूमी राजकीय नाही. पण त्यांची भाषा मात्र राजकीय आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना ते असभ्य आणि एकेरी भाषेचा उल्लेख करतात. त्यांची भाषा ही भाषा कार्यकर्त्याची भाषा नाही ही भाषा राजकिय भाषा आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल असे बोलणे शोभत नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
'आरक्षण न टिकण्याची कारणे सांगा'
मराठा आरक्षण मुद्द्यावर राज्य सरकार गंभीर आहे. त्यामुळेच सरकारने इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता वाढीव कोठ्यातून आरक्षण दिले. याबाबत जी अधीसूचना काढण्यात आली होती त्याव साडेसहा लाख हरकती आल्या आहेत. अनेकांना वाटतं राज्य सरकारने दिलेले 10% आरक्षण न्यायालयात टीकणार नाही. त्यांना ही शंकाच का येते? हे आरक्षण न टिकण्याची कारणे सांगा आम्ही त्यावर उत्तर देऊ, असे आव्हानच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकाकारांना दिले. (हेही वाचा, Manoj Jarange Patil SIT Enquiry: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची एसआयटी चौकशी; राज्य सरकारचा निर्णय)
'मनोज जरांगे पाटील यांच्याशी काहीही देणं-घेणं नाही'
दरम्यान, जाती-पातीत भांडणे लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतो आहे का, हे पाहावं लागणार आहे. आंदोलनादरम्यान दगडफेक कोणी केली? त्यासाठी दगड कोठून आणले याबाबतची सर्व माहिती राज्य सरकारकडे आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडविण्याचाच राज्य सरकारचा प्रयत्न आहे. म्हणून तर मराठा समाजाच्या समूहाला मी दोन वेळा सामोरा गेलो. मला मनोज जरांगे पाटील यांच्याशी काहीही देणं-घेणं नाही. मला फक्त मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. केवळ मराठाच नव्हे तर त्या ठिकाणी कोणताही समाज असता तरीही मी हेच केलं असतं. म्हणूनच तर मी छत्रपती शिवरायांच्या समोर जाहीर शपथ घेतली होती, अशी आठवणही एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भाषणादरम्यान सांगितली. (हेही वाचा, Manoj Jarange-Patil Withdraws His Hunger Strike: तब्बल 17 दिवसांनंतर मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण घेतले मागे; छत्रपती संभाजी नगरमध्ये घेणार उपचार)
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबद्दल जी भाषा वापरत आहेत ती चुकीची आहे. त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य आणि पूर्ण झाल्या आहेत. ज्या मागण्या मान्य आणि पूर्ण होण्यासारख्या होत्या त्या केल्या आहेत. त्यांनी सरकट प्रमाणपत्रांची मागणी केली. पण, त्यांना स्पष्ट सांगितले होते की, सरसकट प्रमाणपत्र हा मुद्दा मान्य होण्यासारखा नाही. त्यांच्या मागण्या सातत्याने बदलत राहिल्या. सरकट प्रमाणपत्रानंतर त्यांनी सगेसोयरे हा मुद्दा आणला. नंतर त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात म्हटले.