Chipi Airport: चिपी विमानतळ उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर; दोघांच्याही भाषणाबाबत उत्सुकता
Uddhav Thackeray, Narayan Rane | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि केंद्रीय सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे एकेकाळचे परस्परांचे सहकारी आणि आजीमाजी मुख्यमंत्री प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. चिपी विमानतळ उद्घाटन (Chipi Airport Inauguration) कार्यक्रमासाठी हे नेते एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. येत्या 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळ (Chipi Airport) उद्धाटन होणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदिया (Jyotiraditya Scindia) यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या कार्यक्रमाबाबत सुरुवातीपासूनच जोरदार उत्सुकता आहे. राज शिष्टाचारानुसार निमंत्रितांच्या यादीत नारायण राणे यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे.

चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रम या आदी नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे जोरदार चर्चेत आला होता. चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलाविण्याची गरज नाही, असे विधान करुन नारायण राणे चर्चेत आले होते. राणे यांच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही राणे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तर तो विभाग माझ्या कार्यकक्षेत येतो त्यामुळे या कार्यक्रमाचे निमंत्रकच आम्ही असणार आहोत, असे म्हटले. (हेही वाचा, Mumbai - Sindhudurg Direct Flight: 9 ऑक्टोबर पासून Alliance Air कडून मुंबई-सिंधुदुर्गदरम्यान थेट विमानसेवा; इथे पहा फ्लाईट शेड्युल, तिकिटाची किंमत)

चिपी विमानतळ हे कोकणवासियांसाठी पाठिमागील अनेक वर्षांपासून एक भावनिक विषय झाला होता. गेली अनेक वर्षे हे विमानतळ विविध कारणांमुळे सेवेत येण्यापासून रखडले होते. अखेर या विमानतळाच्या कार्यक्रमास मुहूर्त मिळाला आहे.कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आणि स्थानिक नेते असल्यामुळे त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करणे आवश्यक आणि राजशिष्टाचाराचा भाग होते.