तब्बल एक महिना चाललेल्या सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. शिवसेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर पहिली कॅबिनेट बैठकही पार पडली. आता आज नवीन महाविकासआघाडी सरकार बहुमत चाचणीला सामोरे जात आहे. काल याबाबत केलेल्या घोषणेनंतर आज दुपारी 2 वाजता विधानसभेत फ्लोअर टेस्टला सुरुवात झाली आहे. मात्र सुरुवातीलाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन संविधानाच्या नियमाला धरून नाही असे म्हणत यावर बेकायदेशीर असा ठपका लावला.
Mumbai: Uproar in Maharashtra assembly after BJP alleges that the special session was not convened as per rules pic.twitter.com/3bdlWEgD6R
— ANI (@ANI) November 30, 2019
याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘27 नोव्हेंबरला यापूर्वीचे अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित केले होते. त्यानंतर पुन्हा अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांचा समाज काढावा लागणे गरजेचे असते, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आजचे अधिवेशन बेकायदेशीर आहे.’ मात्र याबाबत हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी हे अधिवेशन राज्यपालांच्या परवानगीनेच होत आहे असे सांगत, सर्वोच्च न्यायालयाचा निकालही वाचून दाखवला व फडणवीस यांचा मुद्दा फेटाळून लावला.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळाची ओळख करून दिली. यादरम्यान सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर चिडलेल्या सदस्यांचा आरडओरडा आणि शेरेबाजी चालू होती. यावेळी वेळोवेळी अध्यक्षांनी त्यांना हे कामकाज थेट प्रक्षेपित केले जात असल्याची आठवणही करून दिली. मात्र तरीही देवेंद्र फडणवीस आपला मुद्दा सोडायला तयार नाहीत. आता अशा परिस्थितीत हे अधिवेशन पुढे कसे सुरु राहील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.