मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी हा बेकायदेशीर असल्याचे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य; राज्यपालांकडे करणार याचिका दाखल
चंद्रकांत पाटील (Photo credit : facebook)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्विकारून 24 तास उलटून ही गेले नाहीत त्याच्या आधीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी हा बेकायदेशीर असल्याचे म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे या संदर्भात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज या नवीन सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडण्यात येणार आहे.

नव्या सरकारचा शपथविधी बेकायदेशीर असून ती घेण्याची एक पद्धत असून ती त्याचप्रमाणे घ्यावी लागते असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी नव्या सरकारवर सडकून टीका केली आहे. आम्ही या संदर्भात आज राज्यपालांकडे याचिका दाखल करणार आहोत आणि राज्यपालांनी न्याय दिला नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेदेखील वाचा- Maharashtra Government Formation: नव्या सरकारची आज 'सत्वपरीक्षा'; सिद्ध करावे लागणार बहुमत

त्याचबरोबर नव्या सरकारने नियमाप्रमाणे काम करावे अन्यथा त्यांना जास्त दिवस काम करु देणार नाही असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

तर दुसरीकडे विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीने होते असेही पाटील यांनी म्हटले आहे. विधानसभाध्यक्षपद निवडणूक लढवण्याचा भाजपचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुपारी 12 वाजतेपर्यंत अर्ज भरण्यासाठी वेळ देऊ करण्यात आला आहे.

मागील आठवड्यात याच दिवशी 23 नोव्हेंबरला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेली बंडखोरी आणि त्यानंतर घाईघाईत झालेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी ही घटना सर्व महाराष्ट्राला हादरुन टाकणारी होती. त्या घटनेला आज 1 आठवडा पूर्ण व्हायच्या आधीच 28 नोव्हेंबरला आधीच सरकार कोसळून महाविकासआघाडीचे नवीन सरकार आले.