CM Uddhav Thackeray Surgery: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील मुंबई येथील  एच.एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वी
Uddhav Thackeray | (Photo Credit : Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पाठीवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.  मुंबई येथील एच.एन. रिलायन्स (HN Reliance Foundation Hospital In Mumbai) रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. काही दिवसांपासून त्यांना मानदुखी ( Spinal Pain) आणि पाठीच्या दुखण्याचा ( Back Pain) त्रास होता. शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज दिला जाईल. त्यानंतर काही दिवस फिजिओथेरपी आणि विश्रांती घेतल्यावर मुख्यमंत्री पुन्हा एकदा आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करतील.

प्राप्त माहितीनुसार, वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रिलायन्स रुग्णालयातील 19 व्या मजल्यावर असलेल्या विशेष कक्षात ठेवण्यात आले आहे. या वेळी ठाकरे कुटुंबीय आणि त्यांचे स्वीय सहायक मिलींद नार्वेकरही उपस्थित असल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांच्यावर काही वर्षांपूर्वी एक मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांची अॅजीओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर आपली नियमीत वैद्यकीय तपासणी करताना मुख्यमंत्री रुग्णालयात अनेकदा दिसले आहेत. दरम्यान, एखाद्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्यांना प्रदीर्घ काळानंतर रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिमागील काही दिवसांपासून मान आणि पाठ दुखीचा त्रास सुरु झाला होता. सुरुवातीच्या काळात काही प्राथमिक उपचार घेऊन पाहिले. मात्र, आराम न पडल्याने त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यांनतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल झाले. सध्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरुआहे. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray Spinal Pain: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि पाठदुखीचा त्रास, रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूर्णवेळ राजकारणी म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणूक 2019 नंतर एका विशिष्ठ राजकीय परिस्थितीत त्यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. त्यामुळे आजवर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मातोश्री निवास्थानातून पक्षाचा कारभार करणारे उद्धव ठाकरे 'वर्षा' या शासकीय निवासस्थानात दाखल झाले.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच त्यांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागले. यात तौक्तेसारखे चक्रीवादळ, रायगड-रत्नागिरीसह महाराष्ट्रभर कोसळळेला मुसळधार पाऊस, त्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती, कर्जमाफी यांसारख्या विषयावर त्यांना तातडीने काम करावे लागले.

कोरना व्हायरस महामारी हे सर्वात मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्या समोर होते. हे आव्हान पेलताना आणि जबाबदारी पार पाडताना मुख्यमंत्री म्हमून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. तरीही त्यांनी अत्यंत संयतपणे आपली जबाबदारी पार पाडली. त्यांच्या कामाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरुनही कौतुक झाले आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे यांच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे.