Maharashtra Violence: निवडणूक काळात ग्रामीण भागात हिंसाचार वाढण्याची शक्यता, पोलीस यंत्रणा सतर्क
Violence in Sambhajinagar (Photo Credit- Twitter/@ANI)

राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून अनेक भागात हिंसाचाराच्या घटना घडल्याचे पहायला मिळत आहे. राम नवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात हिंसाचाराची घटना घडली होती. अशाच प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना घडवण्याचा प्रयत्न राज्यातील ग्रामीण भागात होऊ शकतो असा इशारा पोलिसांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगरात विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून रुजू झालेल्या डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण (Dr. Dnyaneshwar Chavan) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. एबीपी माझाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात जाती-धर्माच्या किंवा महापुरुषांच्या नावाखाली हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे अशा शक्यता लक्षात घेता ग्रामीण पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जाणार असल्याचं चव्हाण म्हणाले. या सर्व पार्श्वभूमीवर 4 जिल्ह्यांतील तालुके, गाव, वाड्या-वस्त्यांवर पोलिसांकडून सूक्ष्मपणे लक्ष ठेवण्यात येणार आहे. सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या पोस्ट, संवादांवरही विशेष लक्ष असणार आहे, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जाणीवपूर्वक हिंसाचाराच्या घटना घडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकमेंकावर करत असून अशात आता निवडणुकीच्या काळात हिंसाचाराच्या घटना घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो असा दावा पोलीस दलातील एका मोठ्या अधिकाऱ्याने केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे अशा हिंसाचाराच्या घटना कोणाला आणि का घडवून आणायच्या आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.  छत्रपती संभाजीनगर किराडपुरा भागात हिंसाचाराची घटना समोर आली होती.  या घटनेनंतर जिल्ह्यात अनेक छोट्या-मोठ्या वादाच्या घटना सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. तर पोलीस देखील सर्व परिस्थिती आणि हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. विशेष करून सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या लोकांवर थेट कारवाया करण्यात येत आहे.