Chhagan Bhujbal Vs Rohit Pawar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु झालेला शरद पवार गट विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) गट कलह काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. सुरुवातीचे काही काळ 'नो कमेंट्स' मोडवर असलेले अजितदादा गटाचे नेते आता अचानक पवार गटावर पलटवार करु लागले आहेत. यात अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा समावेश आहे. भुजबळ यांनी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अजित पवार गटात असा एकही माणूस नाही जो कोणाला ब्लॅकमेल करेल. उगाच आपलं काहीतरी बोलायचे म्हणून रोहीत पवार बोलत आहेत. उलट भाजपसोबत जाऊया म्हणून सर्वात आधी रोहित पवारच आग्रही होते. त्या पत्रावर सर्वांच्या सह्या असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांच्यासह अनेकांनी भाजपसोबत जायचे आणि मंत्री व्हायचे यासाठी पत्रावर सह्या केल्या होत्या. पण, आता ते उलट बोलत आहेत. असं काहीतरी बोलल्या शिवाय आपण विरोधी पक्षाचे आमदार आहोत हे कसं सिद्ध होईल? म्हणूनच ते अशी वक्तव्ये करत असल्याचेही भुजबळांनी म्हटले आहे. अजित पवार गटातील काही लोक शरद पवार यांच्या समर्थक आमदारांना ब्लॅकमेल करत आहे. पाठींब्यासाठी तू सही कर नाहीतर कामे होणार नाहीत, असा दबाव ते टाकत असल्याचा आरोप रोहीत पवार यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना भुजबळ बोलत होते.

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांच्या टीकेलाही भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते असल्याने त्यांचे काम करत आहेत. विरोधी पक्षात असल्यानंतर ते दुसरं करु तरी काय शकतात? असा खोचक सवालही भुजबळ यांनी केला आहे. छगन भुजबळ यांनी या वेळी शरद पवार यांनी केलेल्या विधानाचीही आठवण करुन दिली. ते म्हणाले की, आपण कायदेशीर लढाई लढणार नसल्याचे पवार साहेब म्हणाले होते. आता मात्र नोटीस देण्याचे काम झालं आहे. त्यामुळे आता पुढे काय होतंय बघू.