Mumbai: रेल्वे स्थानकांच्या हद्दीतील गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी मध्य रेल्वे करणार ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर
ड्रोन (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

Mumbai: मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या हद्दीत अनेक गुन्हेगारी घटना घडतात. या गुन्हेगारी घटनांवर नजर ठेवण्यासाठी आणि रूळ ओलांडणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी मध्य रेल्वे (Central Railway) आता ड्रोन (Drone) कॅमेऱ्यांचा वापर करणार आहे. यासाठी मध्य रेल्वे विभागाने 3 लाख 50 हजारांमध्ये एक ड्रोन खरेदी केला आहे. या ड्रोनच्या साहाय्याने गुन्हेगारीस आळा घालता येणार आहे. या ड्रोनवर 2 किमीच्या परिसरातून कंट्रोल करता येणार आहे.

मध्य रेल्वे विभागाच्या या नाविन्यपूर्ण युक्तीमुळे रेल्वे स्थानकांच्या हद्दीतील गुन्हेगारांवर करडी नजर असणार आहे. यामुळे या परिसरातील गुन्हेगारी घटना कमी होण्यास मदत होणार आहे. हे ड्रोन 25 मिनिटांपर्यंत हवेत उड्डाण करू शकते. या ड्रोनमध्ये रिअल टाइम ट्रॅकिंग, व्हिडिओ, सेफ्टी मोड या सुविधा आहेत. मध्य रेल्वे रेल्वे परिसरात नजर ठेवण्यासाठी लवकरचं आणखी एक ड्रोन कॅमेरा सज्ज करणार आहे. (वाचा - CSMT बनले महाराष्ट्रातील पहिले हरित रेल्वे स्थानक; IGBC कडून मिळाले सुवर्ण प्रमाणपत्र)

मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले की, ज्या रेल्वे स्थानकाच्या हद्दीत अधिक गुन्हे घडतात. त्या स्थानकाच्या परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. रेल्वे हद्दीत नागरिक रूळ ओलांडून ये-जा करत असतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अशा घटनांना आळा घालण्यासाठीही ड्रोन कॅमेऱ्याचा वापर महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचंही श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे.

ड्रोनच्या माध्यमातून रेल्वे परिसरात कानाकोपऱ्यात लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. ड्रोनचा वापर करण्यासाठी आरपीएफच्या 7 कर्मचार्‍यांच्या पथकाला प्रशिक्षण देण्यात आल्याचं जितेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे.