Central Railway Summer Special Trains: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई पुण्याहून चालवणार 154 उन्हाळी विशेष गाड्या
Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

Central Railway Summer Special Trains: मध्य रेल्वे आधीपासून देशभरातील विविध ठिकाणी नियमितपणे विशेष गाड्या चालवत आहे. त्यापैकी अनेक गाड्या उत्तर आणि पूर्वेकडील स्थानकांसाठी चालविल्या जात आहेत. उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नियमित रेल्वेगाड्यांशिवाय मध्य रेल्वेने आतापर्यंत उत्तर व पूर्वेकडील स्थानकांसाठी 7 एप्रिल 2021 ते 15 एप्रिल 2021 या कालावधीत मुंबई, पुणे, सोलापूर भागातून 76 ग्रीष्मकालीन विशेष गाड्या चालविल्या आहेत.

दरम्यान, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने अतिरिक्त गाड्या चाविण्याचे नियोजन केले आहे. मुंबई-पुणे ते उत्तर आणि पूर्वेकडील स्थानकांकारिता एप्रिल-मध्य ते मे 2021 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत आणखी 154 ग्रीष्मकालीन विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत. उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी पाहून त्यावेळेनुसार अतिरिक्त गाड्या चालविल्या जाणार आहेत. (वाचा - Indian Railways: कोरोना काळात रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! 'या' विशेष गाड्या लवकरचं सुरू होणार; पहा संपूर्ण यादी)

या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी www.irctc.co.in या संकेतस्थळावर तिकिटांची बुकिंग करावे. तसेच जाहीर केलेल्या विशेष गाड्यांसाठी नियमित प्रसारित होणाऱ्या जाहिराती आणि नियमित माहितीसाठी सोशल मिडियावर प्रसारित होणारी माहिती पाहावी, अशी विनंती मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.

कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाचं या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. प्रवाशांनी संपूर्ण प्रवासादरम्यान कोविड 19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करणे आवश्यक आहे, असंही मध्य रेल्वेने म्हटलं आहे.