CR Mega Block Update: मध्य रेल्वे कडून कळवा-मुंब्रा दरम्यान 26 सप्टेंबरला दहा तासांचा मेगाब्लॉक
Mumbai local (Photo Credits: Wikimedia Commons)

मध्य रेल्वे (Central Railway) कडून मुंबई मध्ये कळवा (Kalwa) आणि मुंब्रा (Mumbra) स्थानकामध्ये 10 तासांचा मेगा ब्लॉक (Mega Block) जाहीर करण्यात आला आहे. येत्या रविवारी, 26 सप्टेंबर दिवशी मेन लाईनवर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वे कडून दिवा (Diva) आणि ठाणे (Thane) स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम करण्यासाठी हा मेगा ब्लॉक असेल. या ब्लॉक मुळे अंदाजे 90 लोकल ट्रेनच्या फेर्‍या रविवारी रद्द होणार आहेत.

मध्य रेल्वे कडून अशाचप्रकारे ऑक्टोबर महिन्यात 5 तासांचा आणि नोव्हेंबर महिन्यात 10 तासांचे ब्लॉक घेतले जाणार आहेत. ठाणे-दिवा दरम्यान मार्गिकेचं काम 2021 च्या डिसेंबर ते जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. नक्की वाचा: Mumbai Local Update: बोगस ओळखपत्राद्वारे प्रवास करणाऱ्यांना बसणार चाप; Universal Travel Pass चं सरकारचं नियोजन .

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

कल्याण स्थानकातून सकाळी 7.27 ते संध्याकाळी 5.40 पर्यंत सुटणाऱ्या अप मार्गावरील धीम्या आणि सेमी फास्ट लोकल दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर चालवल्या जातील तर पुढे मुलुंड येथे पुन्हा धीम्या मागार्वर लोकल वळवल्या जाणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून सकाळी 8 ते सायंकाळी 5 दरम्यान सुटणाऱ्या आणि सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन होणाऱ्या सर्व उपनगरीय सेवा वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत. ब्लॉक सुरू होण्यापूर्वी दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी शेवटची लोकल सेवा सकाळी 7.38 वाजता आणि ब्लॉकनंतर दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी पहिली उपनगरीय सेवा सायंकाळी 6.02 वाजता सुटेल.

.नव्या मार्गिकांमुळे कल्याणपर्यंतच्या बाहेरगावी जाणार्‍या गाड्या आणि लोकल ट्रेन्स यांना वेगवेगळं चालवणं सुकर होणार आहे. कल्याण यार्डात ट्रेनच्या विभागणीनंतर मध्य रेल्वे सीएसएमटी ते कल्याण दरम्यान 100 अजून नवी लोकल ट्रेन चालवू शकणार आहे.

दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने ठाणे महानगरपालिकेला 100 अधिकच्या बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

सध्या कोरोना संकटामध्ये केवळ लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. यामध्ये सध्या प्रवाशांना रेल्वे तिकीट ऐवजी युनिव्हर्सल पास दिला जात आहे. यासाठी कोविड लस  घेतल्याचं प्रमाणपत्र आणि ओळखपत्र पाहून रेल्वे स्थानकावर हा पास दिला जात आहे.