Megablock Cancelled | Representational Image | (Photo Credits-Facebook)

Mumbai Local Mega Block Update:  मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड-माटुंगा धीम्या आणि पनवेल-वाशी मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील धिम्या लोकल जलद मार्गावरून धावतील. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी आणि रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा रोड-मुंबई सेंट्रल दरम्यान रुळांची काम करण्यासाठी आणि ठाणे स्थानकातील पादचारी पूल पाडण्यासाठी आज (शनिवारी) मध्यरात्री रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान रविवार सकाळी 11.30 ते दु. 4.00 वाजता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लॉक काळात अप धीम्या मार्गावरील सर्व लोकलफेऱ्या अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. तर काही लोकल फेऱ्या सुमारे 20 मिनिटे उशीराने धावणार आहे. (हेही वाचा - रेल्वे तिकीट आरक्षणासाठी नियमात बदल, जाणून घ्या कोणत्या गोष्टीसाठी किती रुपये स्विकारणार

हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवार सकाळी 11.30 ते दु. 4.00 वाजता ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लॉक काळात बेलापूर/पनवेल-सीएसएमटी-बेलापूर/पनवेल या दोन्ही अप-डाऊन मार्गावरील आणि पनवेल - अंधेरी आणि ट्रान्स हार्बरवरील ठाणे- पनवेल -ठाणे लोकल फेऱ्या बंद असणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा रोड ते मुंबई सेंट्रलदरम्यान शनिवारी आणि रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 11.45 ते पहाटे 3.45 पर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे चर्चगेट दिशेकडे जाणाऱ्या जलद लोकल सांताक्रुझ ते चर्चगेट दरम्यान धिम्या मार्गावर धावणार आहेत. पश्चिम मार्गावर रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार नाही, असं पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.