Nanded Hospital Tragedy: नांदेड येथील शासकीय रुग्णालयाच्या कार्यकारी डीनने स्वच्छतागृहाची स्वच्छता केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र पोलिसांनी प्रभारी डीन डॉ. श्यामराव यांच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल नोंदवला आहे. नांदेड रूग्णालयातील दुर्घटनेत 21 वर्षीय महिला आणि तिच्या अर्भकाच्या मृत्यूनंतर डीन शामराव वाकोडे (Dean Shyamrao Wakode) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, अंजली वाघमारे या महिलेला 30 सप्टेंबर रोजी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि रविवारी तिची प्रसूती झाली. या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, वाघमारेंना सांगण्यात आले की अंजलीची नॉर्मल डिलिव्हरी झाली होती आणि आई आणि बाळ दोघेही ठीक आहेत.
डॉ. वाकोडे आणि मुख्य बालरोगतज्ञ यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 304 आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताच्या पतीने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, अंजलीला 30 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. 1 ऑक्टोबर रोजी पहाटे 1 च्या सुमारास तिने एका मुलीला जन्म दिला. प्रसूती नॉर्मल असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांना देण्यात आली. आई आणि बाळ दोघेही चांगले असल्याचे कुटुंबियांना सांगण्यात आलं. (हेही वाचा - Mumbai Rape Case: बलात्कार प्रकरणी डॉक्टराला अटक, दोन गुन्हे दाखल, मालवणीतील घटना)
प्रसूतीनंतर सर्व काही ठीक होते पण, नंतर सकाळी डॉक्टरांनी सांगितले की अंजलीला रक्तस्त्राव सुरू झाला. तसेच बाळाची प्रकृतीही ढासळू लागली. त्यामुळे औषधे, रक्ताच्या पिशव्या व इतर गरजेच्या वस्तू बाहेरून आणण्यास सांगण्यात आले. तथापि, जेव्हा आम्ही औषधे आणि रक्ताच्या पिशव्या देण्यासाठी परत आलो तेव्हा डॉक्टर उपलब्ध नव्हते, असं अंजलीचे वडील कामाजी तांबे यांनी सांगितलं.
तांबे यांनी पुढे सांगितलं की, अंजली आणि नवजात अर्भकाची प्रकृती पाहता आम्ही डीन डॉ. वाकोडे यांची भेट घेतली आणि त्यांना तातडीने डॉक्टर उपलब्ध करून उपचार सुरू करण्याची विनंती केली. तथापि, त्यांनी (रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी) जाणीवपूर्वक त्यांना बसायला आणि थांबायला लावले. त्यांनी अंजलीची तपासणी करण्यासाठी डॉक्टर किंवा स्टाफ नर्स पाठवले नाहीत. डॉक्टरांनी अंजलीच्या बाळाला मृत घोषित केले आणि 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता मृतदेह आमच्या ताब्यात दिला. दोन दिवसांनंतर, 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता अंजलीलाही मृत घोषित करण्यात आले, असे तक्रारीत तांबे यांनी म्हटलं आहे.
डीनने डॉक्टर अंजलीवर उपचार करू दिले नाहीत, असा आरोप तांबे यांनी केला आहे. त्यानंतर कुटुंबीयांना 45 हजार रुपयांची औषधे बाहेरून आणण्यास सांगितले होते, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. डॉक्टर, परिचारिका आणि औषधांअभावी अनेक रुग्णांचा डोळ्यासमोर मृत्यू झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.