Chitra Wagh's husband Kishor Wagh (PC - Twitter)

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे पती किशोर (Kishor Wagh) वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परळच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. आता या प्रकरणी किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मते किशोर वाघ यांच्याकडे असलेली 90 टक्के मालमत्तेचा हिशोब नाही, या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा सर्व सुडबुद्धीने केलेला प्रकार असून मला आणि माझ्या पतीला याबाबत कुठलीही माहिती न देता हा गुन्हा दाखल करण्यात आला. मला माझी बाजू मांडण्याची संधीदेखील देण्यात आली नाही. मात्र, या प्रकरणी मी कायदेशीर लढा देण्यासाठी तयार आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. (वाचा - Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पुणे लष्कर कोर्टात पहिला खटला दाखल; 5 मार्चला होणार सुनावणी)

दरम्यान, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी किशोर वाघ यांना 5 जुलै 2016 एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यावेळी किशोर वाघ यांच्याकडे 1 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली होती.

चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच राठोड यांची चौकशी करून त्यांच्या अटकेची मागणी केली होती. आता किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.