Pollution Free | Pixabay.com

रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फळभाज्यांची लागवड करुन गावाला प्रदुषणमुक्त करण्याची किमया छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीनं (Patoda Gram Panchayat) केली आहे. यासाठी या गावाला कार्बन न्युट्रल विशेष पंचायतीचा व्द‍ितीय क्रमांकाचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी या पुरस्कारांचं वितरण केलं. कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी या ग्रामपंचायतीनं नावीण्यपूर्ण योजना राबविल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातल्या कुंडल गावातल्या सर्व घरांमध्ये आणि रस्त्यावर एलईड़ी बल्ब लावले आहेत. याशिवाय गावात ५ लाख लीटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प कार्यरत आहे. यासाठी गावाला स्वच्छ आणि हरित पंचायत या श्रेणीत सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरविण्यात आलं. संपूर्ण गाव हागणदारी मुक्त असून, पर्यावरण पूरक घनकचरा आणि सांडपाणी प्रकल्प गावामध्ये उभारण्यात आलेला आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळ्या २०० कचऱ्याच्या डब्यांमधून गोळा केला जातो. तसंच गावात १५०० एकरावर जैविक पद्धतीनं शेती करण्यात येते. त्यामुळं त्यांच्या या कुंडल ग्राम पंचायतीच्या कार्याची दखल केंद्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या टिकेकरवाडी ग्रामपंचायतीनं सोलर पॅनल, पवनचक्की, बॉयोगॅसच्या माध्यमातून १५ हजार वॅट वीज तयार केली आहे. यासाठी त्यांना ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय गरिबी निर्मूलन आणि जीवनमान सुधार संकल्पनेसाठी सांगली जिल्ह्यातल्या खंडोबाची वाडी ग्राम पंचायतीला तर महिला स्नेही उपक्रमांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या अलबाड ग्रामपंचायतीला पुरस्कार देण्यात आला.

पंचायत राज मंत्रालय द्वारे दरवर्षी २४ एप्रिलला राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा केला जातो. यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून १७ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह साजरा केला जात आहे. १७ एप्रिल २०२३ ला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. हे पुरस्कार गरिबी निर्मूलन आणि जीवनमान सुधार संकल्पना, निरोगी पंचायत, बालस्नेही पंचायत, जलसमृद्ध पंचायत, स्वच्छ आणि हरित पंचायत, सुविधापूर्ण पंचायत, समाजहितार्थ पंचायत, सुशासन पंचायत, महिला अनुकूल पंचायत अशा ९ श्रेणींत दिला जातो. महाराष्ट्र राज्याला यंदा ५ राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यात प्रथम क्रमांकाचे ३ पुरस्कार तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या प्रत्येकी एक एक पुरस्काराचा समावेश आहे.दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यामध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीद्वारे राबविल्या जाणाऱ्या विशेष कामांची माहिती देऊन अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी panchayataward.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती मिळवा.