Bullock Cart Race Accident: उधळलेला बैलगाडा धकडून नाशिक येथे एकाचा मृत्यू; वाचा नेमकं काय घडलं?
Bullock Cart | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) हा तसा थरारक खेळ असला तरी तो जीवघेणाही ठरु शकतो. नाशिक येथील एका ज्येष्ठ नागरिकाला बैलगाडा शर्यतीदरम्यानच प्राण गमवावे लागले. जगन्नाथ सोनवणे (रा. चाणक्यपुरी सोसायटी, मखमलाबाद-म्हसरूळ लिंक रस्ता) वय वर्षे 64 असे या व्यक्तीचे नाव आहे. नाशिक (Nashik) येथे आयोजित करण्यात आलेली बैलगाडा शर्यत पाहायला गेलेल्या जग्नन्नाथ सोनवणे यांना उधळलेला बैलगाडा धडकला. (Bullock Cart Race Accident) त्यामुळे बैल आणि त्यानंतर बैलगाडीचे चाक सोनवने यांच्या छातीवरुन गेले. परिणामी ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना नाशिक येथील म्हसरुळ परिसरात घडली.

नाशिक येथील म्हसरुळ परिसरात असलेल्या बोरगड येथील ठक्कर मैदानात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन भाजप आमदार राहुल ढिकले आणि म्हसरुळ ग्रामस्थांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. ही शर्यत पाहण्यासाठी जगन्नाथ सोनवणे गेले होते. शर्यत जोरात सुरु होती. दरम्यान, एका फेरीला बैलगाड्या सोडण्यात आल्या. दरम्यान, त्यातील एक बैलगाडा उधळला आणि प्रेक्षकांच्या गर्दीत घुसला. गर्दी झपाट्याने पांगली. मात्र, जगन्नाथ सोनावणे ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना गर्दीच्या वेगाने बाजूला होता आले नाही. परिणामी बैलगाड्याची जोरदार धडक बसली. यात त्यांना जोराचा मार लागला. त्यातच बैलगाड्याचे चाक त्यांच्या छातीवरुन गेले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतू, उपचारा दरम्यान, त्यांचे निधन झाले. (हेही वाचा, Bullock Cart Race Exciting Video: बैलगाडा शर्यतीदरम्यान बैल आणि गाडा शिरले पाण्यात, थरारक प्रसंग, Viral व्हिडिओ पाहून चुकला अनेकांच्या काळजाचा ठोका)

दरम्यान, जग्नाथ सोनावणे यांच्यासह गर्दीतील अनेक जण जखमी झाले होते. त्यांच्यावरही मविप्रच्या आडगाव येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. ज्यांच्या प्रकृतीला आराम पडला त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. इतर तिघांवर उपचार सुरु असतून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, सोनावणे यांच्या मृत्यबद्दल म्हसरुळ पोलीस ठाण्यात आकस्माक मृत्यू नोंद करण्यात आले.