Sonu Sood, Governor Bhagat Singh Koshyari (PC - Twitter)

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) ने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी सोनू सूद यांनी स्थलांतरित मजूरांना त्यांच्या मूळ राज्यात पोहचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची राज्यपालांना माहिती दिली. यावेळी राज्यपालांनी सूद यांचे कौतुक करून त्यांना त्यांच्या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, सोनू सूदने काही दिवसांपूर्वी कर्नाटकला जाणाऱ्या मजूरांसाठी बसची सोय केली होती. त्यानंतर सोनूने उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या प्रवासी मजूरांचीदेखील घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली होती. सोनूच्या या सामाजिक कार्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. (हेही वाचा - आयुष्यातील 78 वर्षात शिकता आले नाही, ते लॉकडाउनमध्ये शिकलो; अमिताभ बच्चन यांची भावनिक पोस्ट)

राज्यपालांनी सोनूला फोन केल्यानंतर त्याच्या ट्विटरवर यासंदर्भात ट्विट करण्यात आलं होतं. राज्यपालांच्या ट्विटला उत्तर देताना सोनूनं त्यांचे आभार मानत तुम्ही केलेल्या कौतुकामुळं काम करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळाली असल्याचं म्हटलं आहे.

सोनूने आतापर्यंत अनेक चित्रपटात खलनायकाच्या भूमिका केल्या. मात्र, रिअल लाईफमध्ये सोनू सूद नायक ठरला आहे. सोनू सूदनंतर महानायक अमिताभ बच्चन यांनीदेखील मजूरांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. कोरोना विरोधातील लढाईत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी भरभरून मदत केली आहे.