Maharashtra Assembly, Lok Sabha Elections: महाराष्टात विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्र घेण्यास भाजप इच्छुक; प्रसारमाध्यमांचा दावा
Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Facebook)

केंद्रीय भाजपा (Bharatiya Janata Party) नेतृत्व आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Poll 2024) आणि महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Elections ) निवडणूक एकत्र घेण्याबाबत जोरदार मंथन करत आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपा नेतृत्वही त्याच अनुषंगाने विचार करत आहे. खरे तर महाराष्ट्र भाजपलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि राष्ट्रीय मुद्दे यांचा मेळ घालत महाराष्ट्रात सत्ता मिळवायची असल्याची चर्चा आहे. 'द हिंदू' नावाच्या वृत्तपत्राने केंद्रीय मंत्र्याच्या (भाजप) हवाल्याने दिलेल्या खात्रीलायक वृत्तात हीबाब ठळकपणे अधोरेखीत केली आहे.

'द हिंदू'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, राज्यातील विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबतच घ्याव्यात, असा महाराष्ट्र भाजपचा सूर आहे. महाविकासआघाडी पक्षांची घट्ट युती आणि शिवसेना पक्षात पडलेली फूट याचा विचार करता केंद्रीय आणि राज्यस्तरीय निवडणुका घेणे भाजपसाठी फायदेशीर ठरु शकते. याबातब एक अहवाल प्रदेश भाजपाने केंद्रीय नेतृत्वाला दिला असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

राज्यातील शिवसेना भाजप युती सरकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री या नात्याने नुकताच विधिमंडळात सादर केला. राज्य सरकारने (सेना-भाजप) घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याचा प्रभाव दिसून येईपर्यंत बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे या प्रभावातून केवळ राज्य सरकारच्या कामगिरीवर सत्तावापसी करणे हे आव्हानात्मक ठरु शकते. सबब लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या तर ते भाजपसाटी फायदेशीर राहिल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आणि राष्ट्रीय मुद्दे यांचा प्रचारात वापर करता येईल, असे महाराष्ट्र भाजपला वाटते, असे वृत्त 'द हिंदू'ने केंद्रीय मंत्र्याचा दाखला देत पण नामोल्लेख टाळत दिले आहे. (हेही वाचा, Maharashtra Politics: आमच्यात कोणतेही भांडण नाही, शिंदे सेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचे वक्तव्य)

राज्यातील महाविकासआघाडीचे घटक पक्ष सध्या एकत्र असल्याचे आणि त्यांच्यातील मैत्री घट्टअसल्याचे चित्र आहे. परंतू, हे सर्व पक्ष विशिष्ट स्वार्थाने एकत्र आले आहेत. त्यामुळे जर विधानसभा, लोकसभा निवडणूक एकत्र घेतली तर त्यांच्यात जागावाटप, प्रचाराचे मुद्दे आणि इतर काही आंतर्विरोधातून फूट पडेल. ज्याचा फायदा भाजपला घेता येईल. शिवसेना सध्या दुबळी आहे. काँग्रेसला अद्यापही सूर गवसला नाही. अशा स्थितीत मविआ जरी एकत्र लढली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे नेते शरद पवार हे केवळ आपल्याच उमेदवारांवर लक्ष केंद्रीत करतील. त्यामुळेही मविआमध्ये फाटाफूट होईल, असे भाकीतही एका केंद्रीय नेत्याने वर्तवले आहे. शिवाय, मविआ एकत्र लढली तर त्याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणावर बसू शकतो. मविआच्या मतांमध्ये फाटाफूट झाल्यास त्याचा फायदा होते. हे महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत पाहायला मिळाल्याचेही निरीक्षण महाराष्ट्र भाजपा नोंदवते.