Swapnil Lonkar Suicide: स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबियांना कर्जफेडीसाठी भाजकडून 19.96 लाखांची आर्थिक मदत
भाजपकडून लोणकर कुटुंबियांच्या कर्जाची परतफेड (Photo Credits: Twitter)

एमपीएससी (MPSC) ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar) या 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले गेले. तसंच स्वप्नीलने आत्महत्येपूर्वी पत्रात मांडलेली त्याची व्यथा प्रकाशझोतात आली आणि त्याच्यावर कर्ज असल्याचे उघड झाले. आता भाजपने स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबियांवरील कर्जाचा भार हलका केला आहे. लोणकर कुटुंबियांवर असलेले 19.96 लाखांचे कर्ज भाजपने फेडले आहे.

19 लाख 96 हजार 965 रुपयांचा धनादेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज लोणकर कुटुंबियांना सुपूर्द केला. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर देखील उपस्थित होते. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली आहे. तसंच महाविकास आघाडी सरकारवर टीकाही केली.

प्रविण दरेकर ट्विट:

"लोणकर कुटुंबियांची भाजप नक्की मदत करेल, असा शब्द मी दिला होता. आज भाजपच्या वतीने लोणकर कुटुंबियांना 19 लाख 96 हजार 965 रुपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश देण्यात आला. एकीकडे 'शब्दाला जागणारी' भाजप आणि दुसरीकडे 'शब्द फिरवणारे' महाविकास आघाडी सरकार," असे दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोणकर कुटुंबियांची भेट घेऊन स्वप्निलच्या बहिणीच्या शिक्षणाचा आणि नोकरीसाठी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले होते. तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी देखील लोणकर कुटुंबियांची भेट घेऊन 10 लाखांची आर्थिक मदत केली होती.