
मुंबई (BMC), ठाण्यातील (TMC) रस्त्यावरील खड्यांच्या मुद्द्यांनी राजकारणात चांगलाच पेट घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरुन आवाज उठवणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई आणि ठाणे महानगरपालिका प्रशासन बुजवलेल्या खड्ड्यांचे केवळ आकडे नाचवत असले तरीही प्रत्यक्षात मात्र रस्त्यांच्या चाळणीमुळे प्रवाशांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. याविरोधात उठणारा आवाज दाबण्याचे प्रयत्न कितीही प्रयत्न केले, तरीही जनतेचा आवाज दाबता येत नसतो, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
मुंबई महानगरपालिकेने गेल्या 24 वर्षांत रस्ते आणि खड्डे यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 21 हजार कोटी खर्च केले आहेत. मात्र, तरीही दरवर्षी तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. कारण महानगरपालिकेतील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने जनतेच्या करातून आलेल्या निधीला खड्डा पाडण्याचे काम सुरु आहे. अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असल्यामुळेच मुंबई महानगरपालिका जरी तब्बल 42,000 खड्डे भरल्याचा दावा करत आहे. परंतु, प्रत्यक्षात हे खड्डे भरलेच गेले नाहीत किंवा झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. हिंदमाता पुलावरील खड्डे एका दिवसात जैसे थे होतात, यातून हेच स्पष्ट होते, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Maharashtra: आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर जिंकण्यास भाजप सज्ज- चंद्रकांत पाटील
ट्वीट-
मुंबई आणि ठाणे महानगरपालिका प्रशासन बुजवलेल्या खड्ड्यांचे केवळ आकडे नाचवत असले तरीही प्रत्यक्षात मात्र रस्त्यांच्या चाळणीमुळे प्रवाशांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. याविरोधात उठणारा आवाज दाबण्याचे प्रयत्न कितीही प्रयत्न केले, तरीही जनतेचा आवाज दाबता येत नसतो !
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 3, 2021
डांबरीकरणानंतर केवळ 12 तासांत पुन्हा खड्डे पडले तेव्हा ठाणे महानगरपालिकेने कंत्राटदारांना अभय देत चार अभियंत्यांना बडतर्फ केले. महानगरपालिका आणि कंत्राटदार यांच्यातील या सहसंबंधांमुळेच चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार शिवसेनेने आरंभला आहे. दोन्हीही महानगरपालिका प्रशासनाकडून अनेकदा झालेल्या अमुक दिवसांत खड्डे भरू अशा पोकळ गर्जना हा कर्तव्य चोख बजावत असल्याचा आव आणून आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा प्रकार झाला आहे. मुंबई-ठाण्यातील नागरिकांना या त्रासातून मुक्त करा, नाहीतर जनता येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवेल, असाही इशारा चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिला आहे.