एकीकडे महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे विरोधक वारंवार बोलत आहेत. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास सत्ताधाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. याचपार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. तसेच आगामी काळात विधानसभेची मध्यावधी किंवा नियमित अशी कधीही निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व 288 जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्यास भाजप सज्ज आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजप राज्यात एक प्रभावी विरोधीपक्ष म्हणून ठामपणे काम करीत आहे. विदर्भ, मराठवाड्यात आलेल्या पुरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाहीत. परंतु, पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी दौरा सुरू केला आहे. राज्यातील आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी आहे. लोकसभा, विधानसभा किंवा महानगरपालिकांच्या सर्व निवडणुका भाजपने स्वबळावर लढावीत, अशी केंद्रीय नेतृत्वाची सूचना आहे. त्यानुसार, संघटना काम करीत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Coastal Road Project News: कोस्टल रोड प्रकल्पावरून भाजप नेते आशिष शेलारांनी सरकारवर डागली तोफ, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याचा केला आरोप
महाविकास आघाडीतील पक्षात गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे ही आघाडी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल की नाही अशी शंका निर्माण होते, असा टोलाही चंद्रकांत पाटील यानी लगावला आहे. तसेच आगामी काळात विधानसभेची मध्यावधी किंवा नियमित अशी कधीही निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व 288 जागा लढवून भाजप पूर्ण बहुमताने विजय मिळवणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.