Vijay Wadettiwar On Kangana Ranaut: कंगना रनौतला Y दर्जाची सुरक्षा देऊन भाजपने महाराष्ट्राच्या मातीसोबत गद्दारी केली -  विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar, Kangana Ranaut (PC - Facebook)

Vijay Wadettiwar On Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्याने संपूर्ण देशाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तिच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेने तिचा समाचार घेतला. त्यानंतर कंगनाने मी मुंबईला येते आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा, असं आव्हान शिवसेनेला दिलं होतं. आज कंगनाला केंद्र सरकारकडून 'Y' दर्जाची सुरक्षा देण्यात आली. कंगना येत्या 9 सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. तिला वाय दर्जाची सुरक्षा दिल्याने राज्य सरकारमधील अनेक नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

कंगना रनौतला Y दर्जाची सुरक्षा देऊन भाजपने महाराष्ट्राच्या मातीसोबत गद्दारी केली आहे, असं काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, 'कंगनाला पाकव्याक्त काश्मीरमध्ये जायचं होतं. तिला पाकव्याक्त काश्मीरवर विश्वास जास्त होता. पाकव्याक्त काश्मीरवर विश्वार असणारे हे देशभक्त आणि महाराष्ट्र पोलिसांवर विश्वार नसणार महाराष्ट्र द्रोही आता देशभक्त. कंगना रनौतला Y काय Z सुरक्षा द्यायला पाहिजे. कंगना रनौत या भाजपच्या पोपट आहेत. उद्या कंगना रनौत भाजप पक्षाकडून विधानसभा, विधानपरिषद सभागृहात दिसतील. यात नवल वाटायला नको,' असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.  (हेही वाचा - Kangana Ranaut to Get Y Level Security: अभिनेत्री कंगना रनौत ला केंद्र सरकार कडून 'Y' दर्जाची सुरक्षा; ट्वीट करत मानले अमित शाह यांचे आभार)

महाराष्ट्र का अपमान कर चलो चले कंगना के साथ, हा नाराच भाजप ने धरला आहे. बिहार निवडणुकीसाठी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र पोलिसांचा अपमान करणाऱ्या भाजपचा जाहीर निषेध, देखील विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. दरम्यान, कंगनाच्या कार्यालयाची मुंबई महापालिकेकडून पाहणी करण्यात येत आहे. कंगनाचे पाली हिलमधील कार्यालय अनधिकृत तर नाही ना, याची तपासणी महापालिकेने सुरू केली आहे. कंगनाने स्वत: यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे.