Bhendwal Bhavishyavani 2019: 300 वर्ष जुन्या 'भेंडवळ भविष्यवाणी' बद्दल इंटरेस्टिंग गोष्टी
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामधील 'भेंडवळ' या गावामध्ये अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी घटमांडणी केली जाते.
अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस काहींसाठी शुभ कार्याची सुरूवात, काहींसाठी सोने खरेदीसाठी पण बुलढाणासह (Buldhana) महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी अक्षय्य तृतीयेची संध्याकाळ 'भेंडवळ भविष्यवाणी' (Bhendwal Bhavishyavani) साठी खास असते. अक्षय्य तृतीयेच्या दुसर्या दिवशी भेंडवळ भविष्यवाणीचा अंदाज जाहीर केला जातो. महाराष्ट्रातील शेतकर्यांचा या प्रथेवर विश्वास असला तरीही अंधश्रद्धा निर्मुलन समिती सह अनेक पुरोगामी विचाराचे लोकं 'भेंडवळ भविष्यवाणी'चं समर्थन करत नाहीत. त्यांच्यामते भेंडवळ भविष्यवाणीला शास्त्रीय आधार नाही त्यामुळे हे केवळ भाकित असल्याचं म्हटलं आहे. Bhendwal Bhavishyavani 2019: 'भेंडवळ घटमांडणी' चा अंदाज जाहीर; पावसाची स्थिती सर्वसाधारण तर देशात सत्ता स्थिर राहणार असल्याचे भाकीत
'भेंडवळ भविष्यवाणी' बद्दल खास गोष्टी
- 'भेंडवळ भविष्यवाणी' ही सुमारे 300 वर्षाहून जुनी प्रथा आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामधील 'भेंडवळ' या गावामध्ये अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी घटमांडणी केली जाते.
- रामचंद्र वाघ यांनी 1650 साली वातावरणातील बदलावरून नक्षत्रांचा अभ्यास करून त्यानुसार पाऊस, पिकांची भविष्यवाणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घटमांडणी सुरू केली. आजही त्यांचे वंशज ही परंपरा पुढे कायम ठेवत आहेत.
भेंडवळ घटमांडणी
अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी शेतामध्ये घटमांडणी केली जाते. त्यामध्ये सात फूट व्यासाचा घट वापरला जातो. घटाच्या मध्यभागी दोन फूट व्यासाचा खड्डा करून त्यामध्ये मातीचे 4 ढेकळे ठेवले जातात. चार ढेकळे पावसाच्या चार महिन्यांचे प्रतीक आहेत. त्यावर पाण्याने भरलेला करवा म्हणजे मातीचे भांडे ठेवले जाते.
करव्यावर वडा, भजे, करंजी, पुरी, सांडोळी, कुरडी, पापड, पानविडा, सुपारी मांडली जाते. तर गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडई यासह 18 प्रकारच्या धान्याची व खाद्य पदार्थांची प्रतिकात्मक मांडणी केली जाते.
प्रतिकात्मक चिन्ह काय सांगतात?
- घटामध्ये ठेवलेली अंबाडी हे दैवत असते तर मसूर शत्रूचे प्रतीक आणि करडई संरक्षण व्यवस्था मानली जाते.
-
सुपारी राजाचे, पानविडा राजाच्या गादीचे, पुरी पृथ्वीचे, सांडोळी-कुरडई चारा-पाण्याचे आणि करंजी अर्थव्यवस्थेचे प्रतीक मानले जाते.
- अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे यामध्ये झालेल्या बदलांचे निरीक्षण करून येत्या वर्षभरातील हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षणव्यवस्था आणि राजकीय घडामोडींबाबत भाकीत वर्तवले जाते.
विदर्भ, खानदेशासह अनेक शेतकर्यांचे या 'भेंडवळ भविष्यवाणी'कडे लक्ष लागलेले असते. शेतकरी अक्षय्य तृतीयेच्या रात्री या शेताजवळ गर्दी करतात. भाकीत जाहीर केल्यानंतर त्यानुसार पुढील पेरणीची आखणी करतात.
आजपर्यंत वर्तवण्यात आलेल्या भविष्यवाणीनुसार 70-75% भाकित खरं ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र हा केवळ अंदाज असतो यामध्ये कोणतेच वैज्ञानिक आधार नाहीत.
(The above story first appeared on LatestLY on May 08, 2019 12:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

