Bharat Bandh: भारत बंद मध्ये दुकानं, अन्य शॉप्स बंद करण्याची बळजबरी करणार्‍यांना मुंबई पोलिसांची ताकीद
Maharashtra Police | (File Photo)

केंद्र सरकारच्या 'कृषी कायद्या' (Farm Bill) ला विरोध करण्यासाठी आज शेतकर्‍यांनी 'भारत बंद' (Bharat Bandh) ची हाक दिली आहे. दिल्ली हरियाणा बॉर्डरवर शेतकरी आंदोलनाला बसले असले तरीही त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज मुंबईमध्ये काही संघटनांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या संपात लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जबरदस्तीने दुकानं बंद करण्याचा प्रयत्न करू नये असे मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police)आवाहन करण्यात आले आहे. Bharat Bandh: शेतक-यांच्या 'भारत बंद' मध्ये महाराष्ट्रात आज काय सुरु, काय बंद राहणार; जाणून घ्या सविस्तर

मुंबई पोलिस प्रवक्तांनी PTI वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या बंदच्या काळात शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पोलिसांच्या सोबतीने राज्य राखीव दलाचे देखील कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. भारत बंदच्या काळात आज शहरात चोख नाकाबंदी आणि पेट्रोलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जर कोणी बळजबरीने दुकानं बंद करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई केली जाणार आहे.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनेने आज भारत बंदची हाक दिली आहे. हे नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. त्यासाठी शेतकर्‍यांना देशभरातील राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार कृषी कायदा रद्द करण्यासाठी शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं असल्याचं सांगत आहे. काल भाजपा कडून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीका केली आहे.  अनेक राजकीय पक्ष केवळ राजकारणासाठी कृषी कायद्याला विरोध करत शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवत असल्याचं सांगत आहेत. यावेळेस त्यांंनी शिवसेना सह माजी कृषीमंत्री शरद पवारांनी बदलेल्या भूमिकेवरही निशाणा साधला आहे.