Rajesh Tope on Bhandara Fire (Photo Credits: ANI/Twitter)

भंडारा जिल्ह्यात (Bhandara Hospital Fire Case) 9 जानेवारीला रुग्णालयातील नवजात शिशू युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला. या घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला. जगात जन्म घेऊन आपल्या आईच्या पदराची ऊब घ्यायच्या आधीच या बाळांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु होती. त्यात रुग्णालयातील कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. या प्रकरणात एका डॉक्टरसह तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे तर तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आलं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

भंडारा रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल काल रात्री उशीरा आला अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.हेदेखील वाचा- Bhandara Hospital Fire: भंडारा जिल्हा रुग्णालय दुर्घटनेप्रकरणी पीडित कुटुंबांना पंतप्रधान निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर

अहवालात नेमंक काय म्हटलं?

रात्री एक ते दीड दरम्यान बेबी वार्मर कंट्रोल पॅनलमध्ये स्पार्क झाल्यानं आग लागली. या ठिकाणी प्लास्टिक मटेरियल होतं. तसेच कॉटन गाद्या,वायर्स होत्या. बेबी वार्मरला आग लागली, त्यावेळी काही बाळं ऑक्सिजन वर होती. आग वाढली आणि ती रूम बंद असल्याने आणि प्लास्टिक मटेरियल असल्याने आग विझल्यावर धूर पसरला. फॉरेन्सिक रिपोर्ट नुसार या घटनेतील तीन बाळांचा आगीमुळे मृत्यू झाला तर 7 बालकं धुरामुळे गुदमरून मरण पावली.

हा संपूर्ण प्रकार निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणामुळे झाल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. या घटनेत जी बिल्डिंग बंधण्यात आली ती 2015 साली पूर्ण झाली. ह्यात national health mission मधून 2 कोटी निधी दिला होता.सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम केलं. 2016 साली याचं उद्घाटन झालं. त्याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाने आगीचे ऑडिट तपासण्याची आवश्यकता होती ते झालं नाही. घाईगडबडीने उद्घाटन झालं, असंही त्यांनी सांगितलं.