Bhandara Hospital Fire: भंडारा जिल्हा रुग्णालय दुर्घटनेप्रकरणी पीडित कुटुंबांना पंतप्रधान निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर
Bhandara Hospital Fire, PM Narendra Modi | (Photo Credits: Twitter, IANS)

Bhandara Hospital Fire: भंडारा जिल्हा रुग्णालय शनिवारी लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला होता. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेतील पीडित कुटुंबाना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने पीडित कुटुंबाना मदतीचा हात दिला आहे. या दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना पंतप्रधान निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या घटनेत जखमी झालेल्या नवजात बालकांच्या कुटुंबाना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

शनिवारी पहाटेच्या सुमारास भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात आग लागल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत 10 बालकांचा मृत्यू झाला होता. तर 7 बालकांना वाचवण्यात यश आलं होतं. या घटनेनंतर पीडित मातांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला होता. या घटनेने संपूर्ण देश हळहळला होता. (वाचा - Bhandara Hospital Fire: तीन मृत मुलांनंतर जन्माला आली होती गोंडस चिमुकली; भंडारा रुग्णालयात लागलेल्या आगीत दाम्पत्याने तिलाही गमावलं)

दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील आग लागलेल्या शिशू केअर युनिटची पाहणी केली. यावेळी त्यांनी घटनेमधून वाचविण्यात आलेल्या सात बालकांवर सुरु असलेल्या उपचाराची माहिती घेतली. तसेच त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला. (Uddhav Thackeray Bhandara Visit: भंडारा येथे पीडितांच्या कुटुबीयांची भेट घेतल्यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले 'मी फक्त हात जोडून उभा राहिलो')

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, भंडारा येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याचा शोध घेण्यात येईल. राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट सक्तीचे करण्यात येणार असून यंत्रसामुग्री घेण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेण्यात येणार आहे. ही घटना कुणाच्या दुर्लक्षामुळे घडली तसेच भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी व्यवस्थेत असलेल्या उणीवा व त्रुटींची सर्वंकष चौकशी करण्याचे निर्देश यावेळी ठाकरे यांनी दिले.