Bhandara Hospital Fire: तीन मृत मुलांनंतर जन्माला आली होती गोंडस चिमुकली; भंडारा रुग्णालयात लागलेल्या आगीत दाम्पत्याने तिलाही गमावलं
भंडारा रुग्णालय आग (Photo Credits: Twitter)

Bhandara Hospital Fire: महाराष्ट्रातील भनारकर दाम्पत्याला गेल्या आठवड्यात लग्नाच्या तब्बल 14 वर्षांनंतर आणि तीन मृत मुलांच्या जन्मानंतर गोंडस कन्यारत्न प्राप्त झाले होते. मुलीच्या जन्माने भनारकर कुटुंबिय आनंदी झाले होते. परंतु भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयात लागलेल्या आगीत त्यांचा आनंद असह्य वेदनांमध्ये बदलला. त्यांच्या दु:खाचा अंदाजदेखील लावला जाऊ शकत नाही. शनिवारी रुग्णालयात लागलेल्या आगीत या गोंडस मुलीव्यतिरिक्त इतर नऊ बालकांचा मृत्यू झाला. हिरकन्या भनारकर (वय, 39) यांनी सलग तीन वर्षांत तीन मृत मुलांना जन्म दिला. अखेर तिने 6 जानेवारीला एका जिवंत मुलीला जन्म दिला. यानंतर या जोडप्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. परंतु, रुग्णालयात लागलेल्या आगीने या मुलीला त्यांच्यापासून हिरावून घेतलं.

रविवारी रात्री भंडारा येथील अकोली पब्लिक हेल्थ सेंटर (पीएचसी) बाहेर हिरकन्या यांचे पती हिरालाल भनारकर यांनी पत्रकारांना सांगितले की, "जे घडलं ते अत्यंत वाईट आहे. हे कुणासोबतही होऊ नये...हसत्या-खेळत्या मुलांमुळे आयुष्याचा आनंद मिळतो." मुलगी हिरावल्याच्या दु: खाने पूर्णपणे विचलित झालेली हिरकन्या सध्या पीएचसीमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे तिच्यासोबत संपर्क होऊ शकता नाही. एका नर्सने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, "हिरकन्या सध्या गंभीर धक्क्यात आहे." (Uddhav Thackeray Bhandara Visit: भंडारा येथे पीडितांच्या कुटुबीयांची भेट घेतल्यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले 'मी फक्त हात जोडून उभा राहिलो')

हे कामगार जोडपे भंडारा येथील साकोली तहसीलमधील उसगाव गावचे रहिवासी आहेत. रुग्णालयातील परिचारिकाने सांगितलं की, "या मुलीचा जन्म गर्भधारणेच्या सातव्या महिन्यात म्हणजेच अकाली झाला होता. तसेच तिचं वजनही कमी होतं. ज्यामुळे तिला तिच्या जन्माच्याचं दिवशी भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या विशेष नवजात काळजी विभागात दाखल केलं गेलं. हिरकन्या शौचास गेली असता ती शौचालयात पडली. त्यामुळे बाळाचा अकाली जन्म झाला. जर हा अपघात झाला नसता, तर दोन महिन्यांनंतर ही मुलीगी स्वस्थ जन्माला आली असती."

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भंडारा जिल्हा रुग्णालयात जीव गमावलेल्या नवजात बालकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे यांनी राज्यातील सर्व रुग्णालयांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, “ही अत्यंत वाईट घटना होती. मी जीव गमावलेल्या काही नवजात मुलांच्या कुटूंबियांना भेटलो. माझ्याकडे त्यांचे दु: ख वाटून घ्यायला कोणतेही शब्द नव्हते. कारण ज्यांनी आपला जीव गमावला त्यांना परत जिवंत केले जाऊ शकत नाही. या आगीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यात ही आग अपघाती होती की सुरक्षा अहवालाकडे दुर्लक्ष केल्यामुळे लागली, हे निष्पन्न होईल."