मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) आज भंडारा (Bhandara ) दौऱ्यावर आहेत. भंडारा जिल्हा रुग्णालात (, Bhandara District Hospital) लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी भंडारा येथे जाऊन पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. जिल्हा रुग्णालयाची पाहणी करुन आढावाही घेतला. या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले 'पीडितां कुटुंबीयांना भेटल्यावर मी केवळ हात जोडून उभा राहिलो. दुसरे मी काहीच करु शकलो नाही. त्यांचे सांत्वन करता येतील असे शब्दच माझ्याकडे नव्हते.'पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंततर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
भंडारा येथील घटनेनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांच्या सुरक्षेचे ऑडिट केले जावे, असे आदेश आपण तातडीने दिले आहेत. तसेच, भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना नेमकी कशामुळे घडली याचे कारण शोधण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती एक महिन्यात आपला अहवाल देईल. मुंबई अग्निशमन दलाचे निवृत्त अधिकारी प्रभात रहांगदळे हेसुद्धा या समितीत असतील असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी या वेळी सांगितले. ही समिती ही घटना अचानक घडली की त्यामागे आणखी काही कारण होते याचा शोध घेईल असेही ते म्हणाले.
चौकशी समितीचा अहवाल आल्याशिवाय आपल्याला कोणत्याही कारणापर्यंत पोहोचता येणार नाही. चौकशी समितीचा अहवाल येऊदेत. तो आला की या प्रकरणात नेमकं दोषी कोण आहे हे समजू शकेल. या घटनेतील दोषींना कोणत्याही प्रकारे सोडले जाणार नाही. त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईल, असे ठाकरे म्हणाले. याशिवाय भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य ती घबरदारी घेतली जाईल. तसेच, त्यासाठी आवश्यक ती मार्गदर्शक तत्वेही ठरविण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray Visit Bhandara District Hospital: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौरा वेळापत्रक, भंडारा जिल्हा रुग्णालय पाहणी करणार, घेणार पीडितांची भेट )
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज भंडाऱ्यातील भोजापूर येथे जाऊन दुर्दैवी कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
या पालकांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत इतकं हे प्रचंड दुःख आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. pic.twitter.com/xfU3jxu9tY
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 10, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडित कुटुंबीय आणि भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली तेव्हा त्यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, भंडारा जिल्हा पालकमंत्री विश्वजित कदम, मलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.