भंडाऱ्यात कार आणि दुचाकीचा (Car Bike Accident) भीषण अपघात झाली आहे. भरधाव वेगात असणाऱ्या कारने दुचाकीस्वारासह पायी जाणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार युवक आणि महिला हे दोघेही जागीच ठार झाले, तर गंभीररित्या जखमी झालेल्या तरूणाचाही उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील पवनी रस्त्यावरील कोंढा परिसरातील चर्चसमोर घडली. दीपक मंगल जुमळे (वय 24), सुमन नामदेव बावनकर (वय 55), रोहित यादव (वय 28), अशी मृतांची नावे असून तिघेही कोंढा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. (हेही वाचा - Mumbai Viral Video: मुंबईत सेल्फीच्या नादात महिलेचा मृत्यू, मुलांच्या डोळ्यादेखत आई वाहून गेली)
मिळालेल्या माहितीनुसार पेरणीचा हंगाम सुरू असल्याने दीपक जुमळे आणि रोहित यादव हे दोघेही दुचाकीने शेतावर गेले होते. तर सुमन बावनकर ही महिला सुद्धा शेतातील पेरणीचे काम आटोपून घरी परतत होती. दरम्यान, पवनीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला तसेच पायी जाणाऱ्या महिलेलासुद्धा कोंढा येथील चर्च समोरच्या रस्त्यावर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या शेतात जाऊन कोसळली.
अपघातनंतर कारचालक हा घटनास्थळावरून पसार झाला होता. तो पालंदर येथील रहिवाशी असून त्याला सुद्धा घटनेत दुखापत झाली आहे. सध्या कारचालक भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.