विधानमंडळात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने विधिमंडळाच्या कामकाजात प्रयत्नशील राहून, उत्कृष्ट कामकाज केल्याबदल महाराष्ट्र विधिमंडळातील बारा सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू (Best Parliamentarian Awards) व उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार (Best Speech Awards) देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या वतीने (कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन- महाराष्ट्र ब्रँच) विधानपरिषदेचे सहा आणि विधानसभेचे सहा अशा एकूण बारा सदस्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रामराजे नाईक-निंबाळकर, डॉ.नीलम गोऱ्हे, नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
असे आहेत पुरस्कार -
विधानपरिषद सदस्य
या पुरस्कारांतर्गत सन 2015-16 साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार ॲड. अनिल परब, 2016-17 साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार विजय ऊर्फ भाई गिरकर यांना तर 2017-18 साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार संजय दत्त यांना प्रदान करण्यात आला. 2015-16 साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार ॲड. राहूल नार्वेकर, 2016-17 साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार कपिल पाटील यांना तर 2017-18 साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रवीण दरेकर यांना प्रदान करण्यात आला.
विधानसभा सदस्य
या पुरस्कारांतर्गत सन 2015-16 साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार डॉ.अनिल बोंडे, 2016-17 साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुभाष साबणे यांना तर 2017-18 साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार राहुल कुल यांना प्रदान करण्यात आला. 2015-16 साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रा. श्रीमती वर्षा गायकवाड, 2016-17 साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार राजेश टोपे यांना तर 2017-18 साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार धैर्यशील पाटील यांना प्रदान करण्यात आला.
दरम्यान, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन मंगळवार दि.7 डिसेंबर 2021 रोजी नागपूर येथे होणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.