परिवहन सेवा Representative Image (Photo Credit: Wikimedia Commons)

मुंबई लोकल नंतर सामान्य नागरिकांची दुसरी प्रमुख लाईफलाईन म्हणजे मुंबई बेस्ट बस (Mumbai BEST Bus). आता रात्रीदेखील बेस्ट बसच्या काही सेवा मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आहे. आज (7 मार्च) पासून या सेवेचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये मुंबईत 6 बसेस रात्री 12 ते पहाटे 5 या वेळेत धावणार आहे. बेस्ट कडून काल याबाबत माहिती देताना लवकरच मुंबई मध्ये Airport Express buses देखील सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे रात्रीचा प्रवास करणार्‍यांना मदत होणार आहे. हे देखील नक्की वाचा:  Universal Pass जोडला जाणार ई-बस तिकिटाशी; जाणून घ्या कसा होणार फायदा.

कोणकोणत्या सहा मार्गांवर धावणार रात्री देखील बस सेवा  

  1. बस नंबर 1 : इलेक्ट्रिक हाऊस - माहिम बस डेपो
  2. बस नंबर 66 (मर्यादीत) : इलेक्ट्रिक हाऊस - राणी लक्ष्मीबाई चौक, सायन
  3. बस नंबर 202 (मर्यादित): माहिम बस डेपो -  पोयरस डेपो
  4. बस नंबर 302: राणी लक्ष्मीबाई चौक, सायन - महाराणा प्रताप चौक (मुलुंड)
  5. बस नंबर 305: बॅंकबे - राणी लक्ष्मीबाई चौक, सायन
  6. बस नंबर 440 (मर्यादित) माहिम बस डेपो-बोरिवली स्टेशन (पूर्व) (डोमेस्टिक/इंटरनॅशन एअरपोर्ट मार्गे)

रात्रीच्या वेळेस धावणार्‍या बस या दर तासाला एक अशी असणार आहे. तसेच ज्या बस रात्री धावणार आहेत त्यांचे मार्किंग बस स्टॉप वर केले जाणार आहे. सध्या रस्ते वाहतूकीमध्ये बेस्ट बस सेवा ही सर्वात स्वस्त सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. यामध्ये एससी बस मध्ये 5 किमीच्या प्रवासासाठी 6 रूपयांपासून तिकीट आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात रात्रपाळीमध्ये काम करणार्‍या अनेक नागरिकांना या सेवेचा फायदा मिळू शकतो अशी आशा बेस्ट बस प्रशासनाला आहे.