BEST Double-Deckers (Photo Credits-Twitter)

मुंबईमध्ये (Mumbai) गुरुवारपासून, सर्व बसची ई-तिकीटे (Bus e-Tickets) संपूर्ण लसीकरण झाल्याचा पुरावा असलेल्या युनिव्हर्सल पासशी (Universal Pass) जोडली जातील. बेस्टचे प्रवक्ते मनोज वराडे म्हणाले, ‘शहरातील सध्याची कोविड-19 परिस्थिती लक्षात घेता तसेच मुंबईत धावणाऱ्या बसेसमध्ये संपर्करहित व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी, बेस्ट 20 जानेवारीपासून युनिव्हर्सल पाससह तिकीट काढण्यासाठीचे 'चलो' मोबाईल अॅप लिंक करत आहे. यामुळे जेव्हा एखादा प्रवासी अॅपद्वारे तिकीट काढेल तेव्हा ते युनिव्हर्सल पासशी जोडले जाईल आणि कंडक्टरकडे असलेल्या तिकीट मशीनद्वारे त्याची पडताळणी केली जाईल.

अशा प्रवाशांना फिजिकल युनिव्हर्सल पास बाळगण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे पाहून महाराष्ट्र सरकारने मुंबई लोकल ट्रेनमध्ये कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली होती. यासाठी लसीकरण झालेल्या प्रवाशांना ऑफलाइन नोंदणी करावी लागत असे. मात्र खिडक्यांवर होणारी गर्दी पाहता सरकारने ऑनलाइन नोंदणी सेवा सुरू केली. संपूर्ण लसीकरण झालेले मुंबईकर ऑनलाइन उपलब्ध असलेल्या युनिव्हर्सल पासच्या मदतीने प्रवास करीत आहेत. (हेही वाचा: Mumbai Mucormycosis: कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेमध्ये मुंबईत म्युकोर्मायकोसिसचा पहिला रुग्ण नोंदवला)

या पासमध्ये क्यूआर कोड असतो, जो स्कॅन केल्यावर तिकीट घेतलेल्या प्रवाशाची संपूर्ण माहिती मिळते. ज्यांच्याकडे युनिव्हर्सल पास नाही त्यांना तिकीट मिळणार नाही, असे रेल्वे आणि सरकारने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, बेस्टने प्रवाशांच्या सोयीसाठी चलो अॅप आणि स्मार्ट कार्ड सादर केले आहे. अॅपच्या मदतीने लोक ऑनलाइन तिकीट आणि पास बुक करू शकतात. कागदी तिकिटांच्या जागी डिजिटल ई-तिकिटांच्या वाढीमुळे वार्षिक 2 कोटी रुपयांची बचत होईल, असे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.