Crime | (Photo Credits: PixaBay)

बीड (Beed) जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका दांपत्याने काळ्या जादूच्या संशयावरुन 6 वर्षीय मुलाची हत्या केली आहे. मुलाच्या कुटुंबियांनी काळा जादू केल्याने आपल्या म्हशीचा मृत्यू झाला असा संशय आल्याने सूडवृत्तीने त्यांनी हे पाऊल उचलले. ही घटना बीड जिल्ह्यातील रत्नागिरी (Ratnagiri) गावामध्ये बुधवार (3 फेब्रुवारी) घडली. रोहिदास सपकाळ आणि त्याची पत्नी देवीबीबाई अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांना गुरुवारी (4 फेब्रुवारी) अटक केली आहे.

गावाकडील शाळेजवळ मित्रांसोबत खेळत असताना बुधवारी सकाळपासून 6 वर्षीय मुलगा बेपत्ता झाला होता. त्यानंतर शाळेजवळच तो पडलेला आढळल्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आपल्या मुलाच्या मृत्यूमागे सपकाळ कुटुंबिय असल्याचे मृत मुलाच्या पालकांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आणि त्यानंतर सपकाळ दांपत्याला अटक करण्यात आली. (पुणे: महिलेवर काळी जादू आणि लैंगिक छळ करणाऱ्या वडील- मुलावर गुन्हा दाखल; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत करत होते अत्याचार)

दरम्यान, सपकाळ कुटुंबियांच्या मालकीची म्हैस नुकतीच मरण पावली होती. मुलाच्या कुटुंबियांनी काळा जादू करुन आपल्या म्हशीला मारले, असा संशय सपकाळ कुटुंबियांमध्ये होता, अशी माहिती साहाय्यक पोलिस इन्स्पेक्टर लक्ष्मण केंद्रे यांनी दिली. (पुणे: आजारी व्यक्तीवर केलेल्या काळ्या जादूवर उपाय म्हणून दोन भोंदूबाबांनी 4 कबुतरांच्या बदल्यात उकळले 6 लाख रूपये)

मुलाचे पालक आणि सपकाळ कुटुंबिय हे एकमेकांच्या नात्यातील आहेत. सपकाळ दांपत्याने मुलाला शाळेजवळून उचलून घरी नेले आणि तिथे गळा घोटून त्याची हत्या केली. पुन्हा शाळेजवळच त्याचा मृतदेह टाकून दिला.