Eknath Shinde | X @ANI

औरंगजेब (Aurangzeb) कोण आहे? तो संत होता का? त्याने काही चांगले काम केले का? लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वाचले पाहिजे आणि 'छावा' हा चित्रपट पाहिला पाहिजे. औरंगजेबाने संभाजी महाराजांवर 40 दिवस अत्याचार केले. त्यांची कबर (Aurangzeb Grave) महाराष्ट्रावर एक कलंक आहे. त्यामुळे ती हटविण्यासाठी निदर्शक छत्रपती संभाजी महाराजांच्या अभिमान आणि बलिदानासाठी लढत आहेत, असे राज्याचे उपमुख्मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले आहे. दरम्यान, नागपूर येथे झालेला हिंसाचार (Nagpur Violence) म्हणजे दुर्दैवी घटना असल्याचे सांगतानाच त्यांनी त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. नागपूर येथे विविध भागात सध्या कर्फ्यू (Nagpur Curfew) आहे.

नागरिकांना शांततेचे अवाहन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (18 मार्च) नागपूर येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ही घटना पूर्वनियोजित कट होती का याचा तपास पोलीस सध्या करत आहेत. या हिंसाचारात डीसीपी दर्जाचे चार अधिकारी जखमी झाले आहेत. समाजकंटकांकडून पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले. या घटनेत शहराबाहेरील लोक सहभागी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मुख्यमंत्री परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. मी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. (हेही वाचा, Nagpur Violence: नागपूर शहरात संचारबंदी असलेली ठिकाणे; औरंगजेब कबर हटवा प्रकरण आणि जाळपोळीचे गंभीर पडसाद)

नागपूरच्या अनेक भागात कर्फ्यू लागू

नागपूर हिंसाचार आणि औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून वाढत्या तणावानंतर, नागपूरचे पोलिस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम १६३ अंतर्गत कर्फ्यू लागू करण्याचा आदेश जारी केला. पुढील सूचना मिळेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील.

कर्फ्यू शहरातील खालील पोलीस ठाणे हद्दीत लागू आहे:

  1. कोतवाली
  2. गणेशपेठ
  3. तहसील
  4. लकडगंज
  5. पाचपावली
  6. शांतीनगर
  7. सक्करदरा
  8. नंदनवन
  9. इमामवाडा
  10. यशोधरानगर
  11. कपिलनगर

नागपूरमध्ये निदर्शने आणि हिंसाचा

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दलाचे सुमारे 200 ते 250 सदस्य नागपूरच्या महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी 17 मार्च रोजी जमले. निदर्शकांनी घोषणा देत शेणाच्या गोवऱ्यांनी भरलेला प्रतीकात्मक हिरवा कपडा दाखवला. त्यानंतर संध्याकाळी 7.30 च्या सुमारास, भालदारपुरा येथे 80 ते 100 लोक जमले, ज्यामुळे तणाव वाढला आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडली. या जमवाजमवामुळे जनतेला त्रास झाला आणि वाहतूक कोंडी झाली. (हेही वाचा, Nagpur Violence: नागपूर हिंसाचार, जाळपोळ, संचारबंदी यांसह गोंधळाने भरलेली रात्र; काय घडले?)

पोलिस कारवाई आणि कायदेशीर परिणाम

  • पुढील अशांतता टाळण्यासाठी पोलिसांनी कलम 163 अंतर्गत प्रभावित भागात "संवाद बंदी (कर्फ्यू)" लागू केली आहे.
  • कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी प्रभावित भागात रस्ते रोखण्याचे अधिकार अधिकाऱ्यांना आहेत.
  • संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या कोणालाही भारतीय न्याय संहिताच्या (BNS) कलम 223 अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

दरम्यान, नागपूर येथे घडलेल्या घटनेबद्दल विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाचे आमदार, मंत्री औरंगजेब कबर हटविण्यावरुन आक्रमक झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या प्रकरणावर निवेदन दिले आहे.