Nagpur Curfew (Photo Credit: ANI)

Law and Order In Nagpur: औरंगजेबाची कबर (Aurangzeb Grave Protest) हटवण्याच्या मागणीवरून वाढत्या तणावानंतर नागपूरमधील अधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS ) कलम 163 अंतर्गत अनेक भागात संचारबंदी (Nagpur Curfew) लागू केली आहे. नागपूर हिंसाचाराचे (Nagpur Violence) शहरात गंभीर पडसाद उमटले त्यानंतर पोलिसांनी कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात आलेल्या कर्फ्यूचा उद्देश पुढील हिंसाचार रोखणे आणि शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखणे आहे. शहरातील विविध भागात कर्फ्यु लागू असून, सदर ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत.

नागपूरमधील संचारबंदी लागू असलेली ठिकाणे

नागपूरचे पोलिस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पुढील सूचना येईपर्यंत कर्फ्यू खालील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत लागू आहे:

  1. कोतवाली
  2. गणेशपेठ
  3. तहसील
  4. लकडगंज
  5. पाचपावली
  6. शांतीनगर
  7. सक्करदरा
  8. नंदनवन
  9. इमामवाडा
  10. यशोधरानगर
  11. कपिलनगर

संचारबंदी लागू होण्याचे कारण काय?

नागपूर हिंसाचार प्रकरणाचे वार्तांकन करताना वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाचे 200-500 सदस्य महालमधील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ 17 मार्च रोजी जमले आणि त्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली. या मागणीनंतर तणाव सुरु झाला. निदर्शकांनी घोषणाबाजी केली आणि निषेध म्हणून शेणाच्या गोळ्यांनी भरलेला प्रतिकात्मक हिरवा कपडा दाखवला. त्यानंतर संध्याकाळी 7.30 वाजता, भालदारपुरा येथे सुमारे 80-100 लोक जमले, ज्यामुळे सार्वजनिक हालचालींमध्ये अडथळा निर्माण झाला आणि तणाव वाढला. खबरदारीचा उपाय म्हणून, पोलिसांनी BNSS च्या कलम 163 अंतर्गत प्रभावित भागात कर्फ्यू लागू केला. (हेही वाचा, Nagpur Violence: नागपूर हिंसाचार, जाळपोळ, संचारबंदी यांसह गोंधळाने भरलेली रात्र; काय घडले?)

कर्फ्यू मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्बंध

कर्फ्यू म्हणजेच संचारबंदी प्रवण क्षेत्रात खालील प्रकारचे निर्बंध लागू असणार आहेत.

  • वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती वगळता कोणत्याही व्यक्तीला घराबाहेर पडण्याची परवानगी नाही.
  • पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास सक्त मनाई आहे.
  • अफवा पसरवणे आणि हिंसाचाराला चालना देणाऱ्या कृतींमध्ये सहभागी होण्यास बंदी आहे.
  • संवेदनशील भागात रस्ते बंद करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे.
  • उल्लंघन करणाऱ्यांना भारतीय न्याय संहिताच्या (BNS) कलम 223 अंतर्गत शिक्षा केली जाईल.

पोलिसांकडून स्पष्ट आदेश

संचारबंदी कोणाला लागू नसेल?

  1. कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी आणि सरकारी कर्मचारी.
  2. आवश्यक परीक्षा देणारे विद्यार्थी.
  3. अग्निशमन विभाग आणि इतर आपत्कालीन सेवा कर्मचारी.

हंसापुरी परिसरात हिंसाचार

कर्फ्यूच्या उपाययोजना असूनही, हंसापुरीमध्ये नवीन हिंसाचार उफाळला, जिथे अज्ञात व्यक्तींनी दुकानांची तोडफोड केली, वाहने जाळली आणि दगडफेक केली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, धारदार शस्त्रे आणि बाटल्यांनी सज्ज असलेल्या मुखवटा घातलेल्या व्यक्तींनी स्थानिक व्यवसायांवर हल्ला केला आणि 8-10 वाहनांना आग लावली. एका रहिवाशाने घटनास्थळाचे वर्णन करताना वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, ते चेहरे झाकून आले, दुकानांची तोडफोड केली आणि वाहने जाळली.  (हेही वाचा, Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात हिंसक दंगल; जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांमुळे वातावरण तापले, CM Devendra Fadnavis यांचे शांततेचे आवाहन (Video))

परिस्थिती नियंत्रणात असल्याची पोलिसांकडून ग्वाही

नागपूरचे पोलिस आयुक्त रविंदर सिंगल यांनी पुष्टी केली की, कायदा अंमलबजावणी सक्रियपणे कोम्बिंग ऑपरेशन करत आहे आणि दंगलीत सहभागी असलेल्यांची ओळख पटवत आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही एफआयआर नोंदवले आहेत आणि कारवाई केली आहे. कलम 144 लागू करण्यात आले आहे आणि नागरिकांना अनावश्यकपणे बाहेर पडू नका किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही त्यांनी सांगितले. अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करत आहेत आणि त्याचबरोबर गैरकृत्य करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करत आहेत, असेही ते म्हणाले.