दुकानदाराला अनेकदा मागणी, विनंत्या आणि पाठपुरावा करुनही युरिया खत (Urea Fertilizer) मिळत नाही, अशा तक्रारी गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांनी कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांच्याकडे केल्या होत्या. शेतकऱ्यांची मागणी पाहून मग कृषमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मनावर घेतले आणि तक्रारीतील सत्यता पडताळण्यासाठी त्यांनी औरंगाबद (Aurangabad) येथील एका दुकानात स्वत: जाऊन पडताळणी केली. या वेळी चक्क कृषीमंत्र्यांनाही दुकानदार खत नाकारत असल्याचा धक्कादायक अनुभव आला. विशेष म्हणजे या वेळी दादा भुसे खत दुकानात शेतकऱ्याच्या वेशात गेले होते, त्यामुळे दुकानदाराने त्यांना ओळखलेच नाही. त्याने दुकानात खत असतानाही ग्राहकास (दादा भुसे) देण्यास नकार दिला.
दुकानदार खत देण्यास नकार देत असल्याचे पाहून दादा भुसे यांनी स्टॉक रजिस्टरची मागणी केली. रजिस्टरची पाहणी करता रजिस्टरवर खत असल्याचे रेकॉर्ड दिसत होते. त्यामुळे दुकानदाराचा बनाव समोर आला. दादा भुसे यांनी मग लागलीच जिल्हा कृषी अधिक्षकांना कारवाईचे आदेश दिले. तसेच औरंगाबादमधील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देशही दिले आहेत.
विशेष असे की, शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर दादा भुसे यांनी औरंगाबाद शहराला अचानक भेट दिली. त्यांच्या या भेटीची माहिती जिल्हा यंत्रणेलाही नव्हती. त्यामुळे जिल्हा प्रशासन यंत्रणा आणि खत दुकानदारही गाफील होते. दादा भुसे हे बाजार समितीच्या आवारातील नवभारत फर्टीलायजर या दुकानात एक सर्वसामान्य ग्राहक म्हणून गेले होते. त्यांनी दुकानदाराला 10 गोणी युरिया मागितला. दुकानदाराने युरिया नसल्याचे सांगितले. भुसे यांनी स्टॉक रजिस्टर मागितले तर, रजिस्टर दुकानात नसून ते घरी असल्याचे दुकानदारान सांगितले. (हेही वाचा, Locust Attack: अमरावती, नागपूर जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण; कृषी विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार)
सामान्य शेतकरी बनून कृषिमंत्री @dadajibhuse पोहोचले औरंगाबाद येथील कृषि निविष्ठांच्या दुकानात. खते शिल्लक असतानाही नकार देणाऱ्या दुकान, गोदामाच्या पंचनाम्याचे जिल्हा कृषि अधीक्षकांना आदेश. गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना पाठविले सक्तीच्या रजेवर.
अधिक वाचा। https://t.co/Sxk0ANJdY1 pic.twitter.com/x4mgajJn6H
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 21, 2020
दुकानदाराची उडवाउडवीची उत्तरे पाहून दादा भुसे यांनी जिल्हा कृषी अधिकक्षकांना दुकानात बोलावून घेतले. दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला. पंचनावा करतेवेळी दुकानाच्या गोडाऊनमध्ये 1386 गोणी युरिया असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर भुसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दुकानदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच, औरंगाबाद येथील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या सूचना दिल्या. या वेळी भुसे यांनी दुकानातूनच कृषी विभागाच्या सचिवांना दूरध्वनी केला आणि यंत्रणांनी अधिक प्रभावी कार्यवाही करण्याची गरज असल्याचे सांगितले.