सांगली: पत्नीकडून दांडक्याने मारहाण, पतीचा मृत्यू; नागवा पुजारी पोलिसांच्या ताब्यात
Umadi Police Station | (फोटो सौजन्य-फेसबुक)

पत्नीने लाकडी दांडक्याने केलेल्या बेदम मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना सांगली (Sangli जिल्ह्यातील जत (Jat Taluka) तालुक्यात घडली आहे. सोमणा पुजारी (वय 55 वर्षे ) असे पतीचे नाव आहे. तर, नागवा पुजारी (Nagva Pujari) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. उमदी पोलिसांनी (Umadi Police Station)  नागवा पुजारी या महिलेस अटक केली आहे. पती सोमणा याला दारुचे व्यसन होते. तो सातत्याने दारु पित असे. त्यांच्यात सातत्याने भांडणे होत असत.

प्राप्त माहितीनुसार, सोमणा पुजारी आणि नागवा पुजारी यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. ते दोघे जत तालुक्यातील सोन्याळ येथील लकडेवाडी येथे निवासाला होते. बुधवार दिनांक 26 जून रोजी सोमणा पुजारी नेहमीप्रमाणे दारु पिऊन आला. सोमणा याने दारु पिली की दोघांमध्ये भांडणेही ही होतच असत. बुधवारीही असेच घडले. सोमणा दारु पिऊन आला आणी त्यांच्यात भांडण सुरु झाले. नेहमीच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नी नागवा हिने घरात असलेले लाकडी दांडके उचलले आणि थेट सोमणा याला चोपायला सुरुवात केली.

पत्नीकडून दांडक्याने मारहाण होताना सोमणा अचानक खाली कोसळला. त्यानंतर पत्नी नागवा ही शेजारच्या घरी गेली. काही वेळाने नागवा परत आली तर, पती जागेवरच पडून होता. तिने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. पण, सोमणा याचा जागीच मृत्यू झाला होता. (हेही वाचा, आळंदीत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यावर रोम मध्ये अ‍ॅसिड हल्ला)

सोमणा आणि नागवा यांना मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. मुलगा आणि सून हे रोजंदारी करतात. सध्या ते कर्नाटक राज्यातील तिकोटा येथे रोजंदारीस होते. पोलिसांनी नागवा हिला अटक केली आहे.