कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ: शिवसेनेला हादरा, युतीला दणका; 26 नगरसेवकांचा राजीनामा, बंडखोर उमेदवाराला जाहीर पाठींबा
Shiv Sena | (Photo credit: Archived, edited, representative images)

भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांनी आपापल्या परिने बंडखोरी रोखण्याचे निकराचे प्रयत्न करुनही विधानसभा निवडणुकीत बंडखोरांचे बंड शमलेच नाही. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या उमेदवारासमोर बंडखोरीचे आव्हान निर्माण झाल्याने जवळपास सर्वच पक्ष हैराण आहेत. अशातच आता बंडखोरी झाल्यानंतर आता पक्षांतर्गत आणि इतर संस्थांमधील बंडखोरांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. कल्याण पूर्व विधानसभा (Kalyan East Assembly constituency) मतदारसंघात अशाच बंडखारांचा सामना शिवसेनेला करावा लागणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तब्बल 26 नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर या सर्व नगरसेवकांनी शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराला जाहीर पाठींबा दिला आहे. या सामुहिक राजीनाम्यानंतर कल्याण शिवसेनेत एकच नाराजी असून, आता त्यावर काय मार्ग काढला जातो याबाबत उत्सुकता आहे.

कल्याणू पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे प्राबल्य असल्याचे मानले जाते. दरम्यान, विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनी नुकताच भाजप प्रवेश केला होत. त्यामुळे युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ भाजपला देण्यात आला. त्यामुळे शिवसेनेच्या धनंजय बोडारे यांनी बंडखोरी केली. बोडारे हे या मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होतो. राजीनामा दिलेल्या 29 नगरसेवकांनी याच बोडारे यांना समर्थन दिले आहे. (हेही वाचा, Maharashtra Assembly Election 2019: 'मनसे'च नाही तर शिवसेना पक्षाचंही निवडणूक चिन्ह होतं रेल्वे इंजिन; जाणून घ्या त्या मागचा संपूर्ण इतिहास)

दरम्यान, कल्याण पूर्वमध्ये 26 नगरसेवकांसोबत 300 पदाधिकाऱ्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समजते. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्यामुळे पक्षप्रमुखांना कमीपणा घ्यावा लागून नये या कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याची भावना शिवसैनिक आणि राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या राजीनाम्यानंतर कल्याण पूर्व मतदारसंघात लढत कशी होते याबाबत उत्सुकता आहे.