Ashtavinayak Helicopter Service : हेलिकॉप्टरद्वारा अष्टविनायक दर्शन सेवा सुरू; इथे पहा कुठे कराल बुकिंग
Ashtavinayaka | Photo credit: Archived, edited, symbolic image)

गणेशभक्तांसाठी खास असलेली महाराष्ट्रातील अष्टविनायक यात्रा (Ashtavinayak Yatra) आता हेलिकॉप्टर (Helicopter) द्वारा देखील करता येणार आहे. 30 मार्च 2022 पासून या बहुप्रतिक्षित सेवेचा शुभारंभ झाला आहे. विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष आणि अष्टविनायक देवस्थान न्यास मंडळ कडून त्याला सुरूवात करण्यात आली आहे. तर वरद एव्हिएशन कडून हेलिकॉप्टर सेवा चालवण्यात येत आहे.

महाराष्ट्र सरकार कडून जुन्नर हे पर्यटन स्थळ घोषित केल्यानंतर जुन्नर मध्ये येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढली आहे. सामान्यपणे 3 दिवसात रस्ते मार्गे आणि बोट यांनी ही यात्रा पूर्ण केली जात असे पण हेलिकॉप्टर द्वारा आता ही यात्रा 7 तासांच्या वेळेत पूर्ण होणार आहे. यासाठी तब्बल लाखभर रूपये भाविकांना मोजावे लागणार आहेत.

ओझर वरून या अष्टविनायक यात्रेचा शुभारंभ होईल पुढे रांजणगाव, सिद्धटेक, मोरगाव, थेऊर, पाली, महड, लेण्याद्री अशी अष्टविनायक यात्रा पूर्ण केली जाईल. हेलिकॉप्टरसाठी प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हेलिपॅडची निर्मिती करण्यात आली आहे.

देवस्थान ट्रस्ट कडून हेलिपॅड ते मंदिर पर्यंत वाहनाची व्यवस्था केली जाणार आहे. एका हेलिकॉप्टरमध्ये 6 जणांची आसनक्षमता असणार आहे. भाविकांची यात्रेपूर्वी आरोग्य तपासणी केली जाईल.