अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या नावाची यंदा पद्मश्री पुरस्कारासाठी (Padmashri Award) शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे. अभिनेते अशोक सराफ यांना बालगंधर्व रंगमंदिर येथे मुनगंटीवार यांच्या हस्ते कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार-2023 प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी अशोक सराफ यांच्या अभिनय कौशल्याचे कौतुकही केले.
रसिकांच्या चेहर्यावर हास्य फुलवणार्या विनोदाच्या बादशाहाने मराठी, हिंदी रसिकांना खिळवून ठेवलं आहे. प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करण्याचे कठीण कार्य त्यांनी अनेक वर्ष केले. त्यांनी आपल्या अभिनयातून समाजातील संस्कारही प्रकट केला, तर दुसरीकडे प्रशासनातील दोषही तेवढ्याच ताकदीने मांडले. अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी अशोक सराफ यांचे कौतुक केले आहे.
अशोक सराफ यांनी सत्कार सोहळ्यात रसिकांचे आभार मानले आहेत. "कलेच्या क्षेत्रात विविधता आणण्याचा प्रयत्न करत असताना कलाकाराला मिळणारे प्रेक्षकांचे पाठबळ महत्वाचे आहे, याशिवाय कलाकाराचे प्रयत्न व्यर्थ आहेत. असे पाठबळ कायम महाराष्ट्राच्या रसिकांनी दिले." असे ते म्हणाले आहेत.
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर या त्रिकुटाने अनेक धम्माल सिनेमातून रसिकांचे मनोरंजन केले आहे. अशोक सराफ यांनी मराठी, हिंदी मालिका, सिनेमे गाजवले आहेत.