मुंबईतील (Mumbai) आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (International Financial Services Centre) गुजरातला हलविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरून महाराष्ट्राचे (Maharashtra) राजकारण पेटले आहे. आयएफएससी गुजरातची राजधीना असलेल्या गांधीनगरला नेण्यासंबंधीची अधिसूचना केंद्र सरकारने काढल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप टिका करु लागले आहेत. यावर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसवरच खापर फोडले आहे. दरम्यान, आयएफएससी आजही मुंबई शक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच काहीजण काँग्रेसच्या तालावर आज टिपऱ्या खेळत आहे, असे बोलून आशिष शेलार यांनी शिवसेनेचे नाव न घेता टोला लगावला आहे.
आज गळे काढणार्यांनी 2007 ते 2014 दरम्यान काय केले? आयएफएससी आजही मुंबईत शक्य आहे..तसा प्रस्ताव आम्हीच दिला होता..आता तुम्ही महाराष्ट्राचे सत्ताधारी आहात नुसता शिमगा करु नका, केंद्राला सांगा...केंद्राकडे मागा, त्यासाठीची प्रक्रिया पुर्ण करा.आम्ही सोबत आहोत. आयएफएससी स्थापन करण्यासाठी उच्चाधिकार समितीने फेब्रुवारी 2007 मध्ये मुंबईत हे केंद्र स्थापनेबाबत एक अहवाल केंद्र सरकारला सादर केला. 2014 पर्यंत तेव्हा महाराष्ट्राच्या काँग्रेसी राज्यकर्त्यांनी ना प्रस्ताव सादर केला ना केंद्रातील काँग्रेस सरकारने त्याचा विचार केला, असे आशिष शेलार म्हणाले आहेत. तसेच बुलेट ट्रेनचे स्टेशन बीकेसी येथे प्रस्तावित करताना केंद्र सरकारने बीकेसी येथे आयएफएससीचा विचार केला आहे. आयएफएससीची इमारत नियोजित करूनच स्थानकाची अट घातली. आता सांगा बुलेट ट्रेनला विरोध कोणी केला? राज्यात कोणताही प्रकल्प येणार म्हटल्यावर विरोधाच्या फुगड्या कोण घालतो? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. एवढ्यावर न थांबता ते म्हणाले की, काहीजण काँग्रेसच्या तालावर आज टिपऱ्या खेळत आहेत.आता आयएफएससी वरुन बेंबीच्या देटापासून जे ओरडत आहेत, शंख करीत आहेत.. कोल्हे कुई करीत आहेत...त्यांची अवस्था तर "आपण हसायचे दुसऱ्याला आणि शेंबूड आपल्या नाकाला" अशी झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. हे देखील वाचा- ‘महाराष्ट्र सरकार आमच्याशी खोटे बोलले’, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या आरोपानंतर भाजपने साधला सरकारवर निशाणा; ‘शिवसेना गप्प आहे, हा राज्याचा अपमान नाही का?’
आशिष शेलार यांचे ट्वीट-
IFSC मुंबईतच व्हावे, हा तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचाच प्रस्ताव होता... याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर माझी सविस्तर प्रतिक्रिया! pic.twitter.com/WPjpRhDCk7
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 3, 2020
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला आहे. गुजरातमध्ये IFSC स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची आणि गुणवत्तेच्या आधारावर मुंबईतच हे प्राधिकरण स्थानांतरित करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. आयएफएससी सेंटर मुंबईलाच ठेवा. हे सेंटर गुजरातला हलविल्यास देशाचे मोठे आर्थिक नुकसान होईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईची पतही घसरेल, असा इशारा यावेळी शरद पवार यांनी दिला.