Ashadi Ekadashi 2021: यंदा 'या' दाम्पत्याला मिळणार मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचा मान
विठ्ठल रखुमाई (Photo Credits: Facebook)

आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) निमित्त होणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचा (Vitthal Rukmini Mahapuja) मान यंदा विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांना मिळाला आहे. मंदिर समिती सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते चिठ्ठी द्वारे मानाच्या वारकऱ्यांची निवड आज करण्यात आली. केशव कोलते हे वर्ध्याचे रहिवासी असून ते 1972 पासून पंढरीची वारी करतात. तसंच मागील 20 वर्षांपासून ते विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देत आहेत. (Pandharpur Wari 2021 Palkhi Time Table: संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा कसा असेल? जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम)

कोविड-19 संकटामुळे गेल्या वर्षीपासून वारी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे दर्शन रांगेतील भविकातून मानाचा वारकरी निवडता येत नाही. म्हणूनच मंदिरात सेवा देणाऱ्या भाविकांमधून मानाचा वारकरी निवडण्यात येत आहे. यावर्षी हा मान कोलते दाम्पत्याला मिळाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांना आषाढी एकदशी दिवशी विठ्ठलाची महापूजा करता येईल. (राज्यातून पंढरपूरच्या दिशेने एकही ST Bus न सोडण्याचे महामंडळाचे आदेश)

दरम्यान, यंदा 20 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा मानाच्या 10 पालख्यांना पंढरपूरात प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. तसंच पंढरपूरात संचारबंदी लागू करण्यात आली असून ठिकठिकाणी नाकाबंदी देखील असणार आहे. एसटी बस सेवेसह सर्व खाजगी वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 2 पासून संचारबंदीला सुरुवात होणार असून 25 जुलैपर्यंत हे आदेश कायम राहणार आहेत.