राज्यातून पंढरपूरच्या दिशेने एकही ST Bus न सोडण्याचे महामंडळाचे आदेश
ST Bus | (Photo Credits: MSRTC)

कोविड-19 संकटाच्या (Covid-19 Pandemic) पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने एकही एसटी सोडू नये, असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर (Solapur) विभागाने राज्यातील सर्व विभागांना दिले आहेत. 20 जुलै रोजी असणारी आषाढी एकादशी निमित्त लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूच्या दिशेने रवाना होतात. मात्र यंदा कोरोना संकटात अनेक निर्बंध लादले गेले असल्याने एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे वारी निमित्त मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असली तरी देखील महामंडाळाने अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत.

सर्व जिल्ह्यांसाठी 17 जुलै दुपारी 2 ते 25 जुलै सायंकाळी 4 पर्यंत हे आदेश लागू असतील. या कालावधीत कोणत्याही जिल्ह्यातून एसटी पंढरपूर येथे येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच पंढरपूर येथून आरक्षणासाठी उपलब्ध केलेल्या सर्व फेऱ्या तातडीने रद्द करण्याचे आदेश सोलापूरच्या विभाग नियंत्रकाने दिले आहेत. त्याचबरोबर आंतरराज्य-आंतरजिल्हा नाकाबंदी असून पंढरपूर तालुका आणि शहरातही नाकाबंदी करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.

कोरोनामुळे यंदा वारीसाठी येणाऱ्या पालख्या, दिंड्यां यांनाही बंदी घालण्यात आली आहे. परंतु, तरी देखील भाविक चोरट्या मार्गाने पंढरपूरात दाखल होऊ नयेत, म्हणून महामंडळाकडून असे आदेश काढण्यात आले आहेत. (Pandharpur Wari 2021 Palkhi Time Table: संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा कसा असेल? जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम)

दरम्यान,  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे.  19 जुलै रोजी संतांच्या पादुका एसटी बसने पंढरपूरकडे रवाना होतील. इतर सर्व सोहळे मर्यादीत वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरे करण्यात आले.