Aryan Khan याची कोठडी वाढणार का? NCB काय करणार मागणी?
Aryan Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या कोठडीत वाढ होणार की त्याला जामीन मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) त्याला कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणात रविवारी ( 3 ऑक्टोबर 2021) अटक केली. दरम्यान, या प्रकरणात एनसीबी (NCB) त्याला पुढील कोठडी मागणार नसल्याची माहिती आहे. एनसीबीने अटक केल्यावर आर्यन खान याला मुंबई न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्याला एनसीबी कोठडीत पाठवले होते. आज (सोमवार, 4 ऑक्टोबर) पुन्हा त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

दरम्यान, आर्यन खान याला आज न्यायालयासमोर हजर केले जाईल. या वेळी एनसीबी त्याची कोठडी वाढवून मागणार नसल्याची माहिती आहे. इंडिया टुडे ने याबाबत वृत्त दिले आहे. आर्यन खान याला न्यायालयात हजर करताच त्याचे वकील न्यायालयाकडे जामीन अर्ज करतील. या वेळी एनसीबी कोठडी वाढवून मागणार नसल्याचे वृत्त आहे. आर्यन खान याच्यासोबत इतरही काही जणांना याच प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा अशी या दोघांची नावे आहेत. ड्रग्ज प्रकरणात कथित सहभागासाठी एनसीबीने या सर्वांना अटक केली आहे. (हेही वाचा, Aryan Khan Arrested: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक; Drugs प्रकरणामध्ये NCB ची मोठी कारवाई)

आर्यन खान याच्यावर बंदी असलेल्या पदार्थांचे सेवन आणि खरेदी-विक्री केल्याचा आरोप आहे. एनसीबीने माहिती देताना एका निवेदनात म्हटले आहे की, आर्यन खान आणि त्याच्यासोबतच इतर प्रमुख तीन आरोपींन आज (सोमवार) न्यायालयात हजर केले जाईल. तसेच, या प्रकरणातील इतर पाच आरोपी नुपूर सतिजा, इश्मीत सिंग चड्ढा, मोहक जयस्वाल, गोमित चोप्रा आणि विक्रांत चोकेर यांनाही एनसीबीने रविवारी (4 ऑक्टोबर) अटक केली आहे.

एनसीबीने गांधीजयंती दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबरला मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणआर्या कोर्डेलिया क्रूझवर छापा टाकला. यात काही आमली पदार्थ आढळून आले. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या व एक लाख 33 हजारांची रोकड असा मुद्देमाल आढळून आला होता. आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच आरोपींनी अंमली पदार्थाचे सेवन केले होते किंवा नाही याबाबत माहिती मिळणार आहे.

मला अटक करण्यात आल्याचे मी स्वीकारत आहे. मला कोणत्या कारणासाठी अटक करण्यात आलेली आहे याबाबत माहिती आहे. त्याबाबत मी माझ्या कुटुंबीयांना कळविले असल्याची माहिती आर्यन खान याने अटक झाल्यानंतर दिलेल्या लेखी निवेदनात दिली आहे. आर्यन खान आणि या प्रकरणातील इतर सर्वांवार अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.