Arvind Jagtap | (PC - Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांची एका पुस्तकाच्या माध्यमातून थेट छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्याशी तुलना करण्यात आल्याने निर्माण झालेल्या वादावर ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) पत्र फेम लेखक अरविंद जगताप (Arvind Jagtap) यांनी आपल्या खास शैलीत तीव्र शब्दांतून निशाणा साधला आहे. 'राजकीय माकडं सत्ता बदलली की ईमान बदलतात. आपला राजा बदलतात. पण मावळ्यांचे राजे नेहमी एकच असतात. छत्रपती शिवाजी महाराज. आजपण, ऊद्यापण, कधीपण', असे म्हणत जगताप यांनी या वादावर भाष्य केले आहे.

अरविंद जगताप हे लेखक आहेत. ते समाजमाध्यमांवर नेहमीच सक्रीय असतात. समाजातील विविध आणि ज्वलंत विषयांवर ते आपली भूमिका तटस्तपणे मांडण्याचा प्रयत्न करतात. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून प्रसिद्ध होणारी अरविंद जगताप यांची पत्रं समाजातील विविध विषयांवर भाष्य करतात तसेच, समाजातील फोलपणा दाखवून देतात. सध्या महाराष्ट्रात आपल्या शिर्षकावरुन वादग्रस्त ठरलेल्या 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' (Aaj Ke Shivaji -Narendra Modi) या पुस्तकाबाबतही जगताप यांनी आप्रत्यक्षरित्या आक्षेप नोंदवला आहे. जगताप यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून हा आक्षेप नोंदवला आहे. जगताप यांनी आपले पोस्टमध्ये कोणाचाही नामोल्लेख केला नसला तरी, शब्दांतील धार आणि मांडणी पाहता ते सध्याच्या पुस्तकवादावर भाष्य करु इच्छितात असे दिसते. (हेही वाचा, कधीच शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागू नका: अरविंद जगताप यांची युती आणि आघाडीवर तीव्र टीका)

अरविंद जगताप फेसबुक पोस्ट

जय भगवान गोयल नावाच्या व्यक्तीने लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन भाजप कार्यालयात नुकतेच झाले. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकावर त्याच्या शिर्षकावरुन महाराष्ट्रातील तमाम इतिहासकार, शिवाजी महाराजांचे वंशज आणि विविध राजकीय नेते आणि राजकीय पक्ष यांनी आक्षेप घेतला आहे. याच वादावरुन शिवसेना खासदार संजय राऊत आणि कोल्हापूरातील खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यात ट्विटरवर खडाजंगी पाहायला मिळाली. तर, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षानेही या पुस्तकाविरोधात आपली भूमिका व्यक्त केली आहे.