Maharashtra Home Minister Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरूद्ध सीबीआयने कथित लाचखोरी प्रकरणात एफआयआर (FIR) दाखल केला आहे. आज या प्रकरणी मुंबईत दहापेक्षा जास्त ठिकाणी सीबीआयची (CBI) छापेमारी सुरु होती. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचा आरोप करून, हायकोर्टाकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणात उच्च न्यायालयाने 5 एप्रिल रोजी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. आजच्या छापेमारीनंतर अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य केले’, असे त्यांनी म्हटले आहे.

शंभर कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात सीबीआयने महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आज छापा टाकला आणि अनेक कागदपत्रे हस्तगत केली. वरळी येथील अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयची सुमारे सात तास छापेमारी सुरु होती. यानंतर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणतात, ‘सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करून मी कोरोनाच्या अनुषंगाने काटोल व नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी निघालो आहे.’

माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख व इतरांशी संबंधित प्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रभर 4 ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त केली. छापेमारी करणाऱ्या सर्व सीबीआय अधिकाऱ्यांनी पीओपी किट्स परिधान करत, कोरोना विषाणू प्रोटोकॉलचे अनुसरण केले होते.

नक्की काय आहे प्रकरण -

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, असा आरोप केला होता की गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल इत्यादींमधून पोलिस अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर परमबीर सिंग यांनी न्यायालयात याबाबत याचिकाही दाखल केली होती. याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्याविरूद्ध सीबीआय चौकशीचे आदेश दिले होती. सीबीआयने 14 एप्रिल रोजी देशमुख यांना चौकशीसाठी बोलावले होते. देशमुख सुरुवातीपासूनच आपल्यावर लावण्यात आलेले आरोप नाकारत आहेत. त्याचवेळी राज्य सरकारनेही त्यांचा बचाव केला, परंतु सीबीआयच्या तपासणीच्या पार्श्वभूमीवर देशमुख यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आज आज सीबीआयने त्यांच्या घरावर छापा टाकला होता.