Rutuja Latke | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणजेच त्यांच्या 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी आणि मुंबई महापालिका (BMC ) कर्मचारी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनाम्यावरुन निर्माण झालेला पेच सुटला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारुन तसे पत्र उद्या (14 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांना देण्यात यावे, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मुंबई महापालिकेला दिले आहेत. एक महिना संपत आला तरीसुद्धा मुंबई महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. त्यामुळे ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टात दाद मागावी लागली. अखेर कोर्टाला दखल घ्यावी लागली आणि लटके यांचा राजीनामा स्वीकारावा असे आदेश बीएमसीला द्यावे लागले.

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटात जल्लोषाचे वातावरण आहे. न्यायालयाच्या निर्णयाबाबत बोलताना शिवसेना आमदार अनिल परब म्हणाले की, अंतिम विजय हा सत्याचाच होतो. ऋतुजा लटके यांना न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे हेच स्पष्ट झाले आहे. माझे आजही विरोधी पक्षांना म्हणने आहे. इतक्या खालच्या दर्जाचे राजकारण करण्याची गरज नाही. दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी आणि कुटुंबातील व्यक्ती निवडणूक लढत आहेत. त्यामुळे अशा वेळी ही जागा बिनविरोध लढली जायला हवी. राज्याचे राजकारण तितके सुसंस्कृत नक्कीच आहे. मात्र, अलिकडील काळात राजकारण वेगळेच घडते आहे. ऋतुजा लटके यांनी राजीनामा देऊन एक महिना झाला. त्या ऑफिसलाहीजात नाहीत. तरीही महापालिकेच्या वकीलाने त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार असल्याचे कोर्टात सांगितले. ही तक्रार 12 तारखेला दाखल झाली. म्हणजे राजकारण किती खालच्या पातळीवर चालले आहे याचेच हे द्योतक असल्याचेही अनिल परब म्हणाले. (हेही वाचा, Andheri East Bypoll 2022: ऋतुजा लटके यांच्या राजीनामा अर्जावर बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल काय म्हणाले? घ्या जाणून)

मुंबई महापालिका कर्मचारी ऋतुजा लटके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आज (13 ऑक्टोबर) सुनावणी घेतली. ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri Bypoll 2022) उमेदवारी करु इच्छितात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्या संभाव्य उमेदवार मानल्या जात आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेतील नोकरीचा राजीनामा प्रशासनाकडे सोपवला आहे. दरम्यान, राजीनामा देऊन महिना उलटला तरी प्रशासनाने त्यावर अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे लटके यांनी न्यायलयाकडे दाद मागितली होती.

ट्विट

ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरुन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर मोठाच पेच निर्माण झाला होता. ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यासाठी उद्धव ठाकरे गट आग्रही होता. दरम्यान, ऋतुजा लटके यांनी राजीनामा देऊन एक महिना उलटला तरी त्यांचा राजीनामा मंजूर होत नव्हता. त्यामुळे लटके यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता होती.