Rutuja Latke | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई महापालिका (BMC ) कर्मचारी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय उद्या (12 ऑक्टोबर) सुनावणी घेणार आहेत. ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri Bypoll 2022) उमेदवारी करु इच्छितात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्या संभाव्य उमेदवार मानल्या जात आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेतील नोकरीचा राजीनामा प्रशासनाकडे सोपवला आहे. दरम्यान, राजीनामा देऊन महिना उलटला तरी प्रशासनाने त्यावर अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे लटके यांनी न्यायलयाकडे दाद मागितली आहे.

ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरुन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर मोठाच पेच निर्माण झाला आहे. ज्या व्यक्तीला उमेदवारी दाखल करायची असते त्या व्यक्तीला कोणत्याही सरकारी सेवेत महत्त्वाच्या पदावर सक्रीय राहता येत नाही. त्यामुळे सदर व्यक्तीने पदाचा राजीनामा द्यावा ही अपेक्षा असते. परंतू, राजीनामा देऊन महिना उलटला तरी त्यावर कोणताही निर्णय पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला नाही. दुसऱ्या बाजूला त्यांनी (लटके) सुधारीत राजीनामा पाठवला तरीही त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. परिणामी लटके यांनी न्यायालयात दाद मागितली. (हेही वाचा, Andheri East By Poll: ऋतुजा लटके यांचा राजीनामा रखडण्यामागे शिंदे गटाचा दबाव, कोर्टात दाद मागणार - अनिल परब)

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी महापालिका प्रशासन राज्य सरकार आणि इतर कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. सर्व नियम व अटी शर्थींचे पालन करुन ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला आहे. तातडीने राजीनामा द्यायचा असेल तर एक महिन्याचे वेतन महापालिकेला जमा करावा लागते. ही अटही पूर्ण केली असली तरीही राजीनाम्यावर निर्णय होत नाही. त्यामुळे यातूनच दिसून येते की प्रशासन दबावाखाली काम करत आहे, असे आमदार परब म्हणाले.

ट्विट

दुसऱ्या बाजूला, राजीनामा मंजूर करणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे ती पूर्ण करण्यास एक महिना लागतो. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.