Anant Chaturdashi 2019: गणपती विसर्जनानिमित 12-13 सप्टेंबर रोजी रात्रभर धावणार लोकल- पश्चिम रेल्वे
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2019) दिवशी, गणपती विसर्जन (Ganpati Immersion) दरम्यान प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, पश्चिम रेल्वेने (Western Railway) 12-13 सप्टेंबर रोजी मध्यरात्री आठ विशेष लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संध्याकाळी 5 ते साडेसह दरम्यान अप दिशानिर्देशातील सर्व जलद गाड्या मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने 12 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या सर्व स्लो लोकल चर्नी रोड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर थांबणार नाहीत.

12 आणि 13 सप्टेंबर रोजी मध्यरात्री विरार ते चर्चगेट स्पेशल लोकल रात्री सव्वाबारा वाजता रवाना होईल. ही लोकल चर्चगेटला रात्री 1.15 वाजता पोहचेल. त्यानंतर विरार ते चर्चगेट या मार्गावर दर अर्ध्या तासाच्या अंतराने एक खास लोकल धावेल. त्याचप्रमाणे पहिली विशेष लोकल चर्चगेट येथून 1.15 वाजता रवाना होईल. ही लोकल विरार येथे 2.50 वा. पोहचेल. त्यानंतर चर्चगेट ते विरार मार्गावरही दर अर्ध्या तासाने लोकल धावेल. (हेही वाचा: Anant Chaturdashi 2019: गणेश विसर्जनासाठी बदलण्यात आले मुंबईतील वाहतूकीचे मार्ग, ट्विटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सादर केला नकाशा

दरम्यान, गणपती विसर्जनासाठी मुंबईत 50 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहे. तसेच वाहतुकीत बाधा येऊ नये म्हणून 12 सप्टेंबरला वाहतुकीचे मार्गही बदलण्यात आले आहे. मुंबईत 129 ठिकाणी बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, अक्सा बीच, वर्सोवा बीच आणि मार्वे बीच येथे मोठ्याप्रमाणावर गणेश विसर्जन करण्यात येते. विसर्जन मिरवणूकीसाठी 53 रस्ते बंद ठेवण्यात येणार आहे. तर 56 रस्त्यांवर एकाच दिशेची वाहतूक सुरु राहिल. अवजड वाहतूकीसाठी 18 रस्ते बंद ठेवण्यात आले असून 99 ठिकाणी पार्किंगला मनाई करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींचा एका नकाशा मुंबई पोलिसांनी शेअर केला आहे.