Dilip Walse-Patil | (Photo Credit : Facebook)

राज्यातील सामाजिक शांतता कायम राहावी यासाठी लवकरच एक सर्वपक्षीय बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीला राज्यातील विरोधी पक्षनेते, राज्यातील विविध प्रमुख पक्षनेत्यांना बोलावले जाईल. राज ठाकरे यांनाही बोलावले जाईल. राज्यातील सामाजिक शांततेबाबत या बैठकीत चर्चा करुन एक सर्वसमावेशक धोरण ठरवले जाईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Pati) यांनी म्हटले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी प्रत्येक घटकाने काळजी घ्यावी. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला धक्का लागेल असे काणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. गृहमंत्री आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्यात एक बैठक आज (20 एप्रिल) पार पडली. या बैठकीनंतर वळसे पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

समाजातील काही लोक सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.धार्मिक स्थळांवरील, खास करुन मशिदी भोंगे लावत असताना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. ज्यांना आपापल्या धार्मिक स्थळांवर भोंगे लावायचे आहेत त्यांनी कायद्याचे पालन करुनच भोंगे लावावेत, असेही गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले. (हेही वाचा, Maharashtra: मुस्लिम संघटनेचे मशिदींना आवाहन - लाऊडस्पीकर लावण्यापूर्वी सरकारची परवानगी घ्या)

दरम्यान, मंदिरात सीसीटीव्ही आहेत तर मग मशिंदींमध्ये सीसीटीव्ही का नाहीत? असा सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे. यावर बोलताना वळसे पाटील यांनी सांगितले की, कोणत्याही धार्मिक स्थळावर सीसीटीव्ही लावण्यास राज्य सरकार सक्ती करत नाही. ज्यांना सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावायचे आहेत त्यांनी ते स्वत:हून लावावेत, असेही ते या वेळी म्हणाले.